मनू महाराजांच्या निधनाने दासगणू परिवार झाला पोरका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

मनोहर कोकलेगावकर उर्फ मनू महाराज गेल्याचे वृत्त सोशल मीडियावर आले आणि सर्व भक्तांना आपल्या घरातीलच व्यक्ती गेल्याची भावना निर्माण झाली. महाराष्ट्रात विखुरलेला दासगणू परिवार हळहळला. संध्याकाळ शोकमग्न झाली? याचे कारण सद्गुरू सेवेने मनू महाराजांनी मिळविलेले सर्वांच्या हृदयातील स्थान.

नांदेड : ब्रह्मलीन अप्पांच्या किर्तनातील अखेरचा साथीदारही शनिवारी (ता.१६ मे) वयाच्या ७९ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला. ज्यांनी ज्यांनी अप्पांची कीर्तने अनुभवली त्यांना त्यांना मनू महाराज, छगन काका, बाबुकाका यांच्यासह कीर्तनाला उभे असणाऱ्यात अप्पांची मूर्ती स्मृतींमधून आजही जात नाही. अप्पांच्या मागे साथीला उभे असणारे आणि पदाच्या वेळी स्वरासाठी छगन काकांकडे व तालासाठी बाबुकाकांकडे झुकणारे मनू महाराज प्रत्येकाच्या कायम स्मरणात आहेत.

हेही वाचा - कोरोना अपडेट : नांदेडमध्ये आज तीन पॉझिटिव्ह, संख्या गेली ११९ वर

दिवंगत मनू महाराजांचे व्यक्तिमत्व अप्पांच्या व्यक्तिमत्वात विलीन झाले होते. अप्पा म्हणजे मनू महाराजांसाठी सद्गुरू तर होतेच; पण पितृतुल्यही होते. तसेच अप्पांच्या मानसपुत्रांपैकी मनू महाराजसुद्धा त्यांच्या सेवेत अग्रणी होते. मनू महाराजांनी सर्व संसाराचा भार सद्गुरू सेवेला समर्पण केला व इतर उद्योगधंद्यात न रमता केवळ कीर्तन परंपरेवरच उदरनिर्वाहाची भिस्त ठेवली. त्यामुळे त्यांचा लोकसंग्रहसुद्धा अगदी घनिष्ठ राहिला. ज्या घरी मनू महाराज उत्सवादी प्रसंगाने किर्तनासाठी राहिले ते घर त्यांच्या लाघवी स्वभावाने त्यांनी आपलेसे केले.  

हे देखील वाचाच - नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा.... कसा तो वाचा

अप्पांच्या एकूणच व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने महाराष्ट्रातील अनेकांनी आपली जीवननौका सुयोग्य वाटेवर आणली. परंतु, अंतरंग सेवाधारी म्हणून मनू महाराजांनी वयाच्या तारुण्यापासून केलेली अप्पांची सेवा केवळ अवर्णणीयच होती. समर्थांच्या सेवेकऱ्यांमध्ये शिष्योत्तम कल्याण स्वामी असोत किंवा आचार्यांच्या शिष्यांपैकी छाटी धुणारे पद्मपाद असोत. या सर्वांनी सद्गुरूंच्या शरीरसेवेत धन्यता मानली. अशा भाग्यवंतांपैकी मनू महाराज एक होते. अप्पांच्या सानिध्यासाठी भक्तगण दूरून दुरून वेळात वेळ काढून येत. त्यापैकी फारच कमीजणांना अप्पांचा सहवास मिळायचा.  

येथे क्लिक कराच - Video - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ज्ञानमंदिरांचा आधार, कसा? ते बघाच

तुकाराम बुवा आजेगावकर, आमचे आजोबा यांच्या गाण्याचा ढंगही मनू महाराजांच्या नैसर्गिक गळ्याची शोभा वाढविणाराच होता. अनेक वर्ष अप्पांच्या कीर्तनाच्या साथी करतानाही त्यांनी स्वतंत्र कीर्तनाचा सराव ठेवल्याने त्यांची ओळख कीर्तनकार म्हणूनही प्रसिद्ध राहिली. त्यामुळे दादानंतर आमच्या आजोबांकडील पंढरपुरातील रुक्मिणी मातेच्या नवरात्रोत्सवातील दहा दिवसांची कीर्तनसेवा अप्पांनी मनू महाराजांना दिली व ती मनू महाराजांनी शेवटपर्यंत नित्योपासनेप्रमाणे सांभाळली.  

दादा व तुकारामबुवा यांच्याप्रमाणे त्रिपुंड गंधाचा छापही मनू महाराजांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने जाणवत होता. त्यामुळे दादांच्या व आप्पांच्या सेवेसाठी अगदी तारुण्यात आलेला कोकलेगावचा तरुण आपल्या सेवेच्या बळावर सर्व सद्गुरू भक्तांच्यामध्ये आदराचे स्थान मिळवून मनू महाराज झाले. 
- शंकर माधवराव आजेगावकर (परभणी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demise Of Manu Maharaj the Dasganu family Became Orphans