एक जानेवारीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार! कोण म्हणाले वाचाच....

हफीज घडीवाला
Thursday, 27 August 2020

कंधार तालुक्यातील बोरी (बुद्रुक) येथे गुरुवारी (ता. २७) श्री महादेव मंदिर परिसराच्या पाच कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कंधार (जि. नांदेड) - महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार असून कोणाचा कोणास पायपोस नाही. त्यामुळे विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. कधी सत्तेतील काँग्रेसचे आमदार नाराज तर कधी राष्ट्रवादीचे नाराज. आता तर सेनेचे खासदारही सरकारवर नाराजी व्यक्त करीत आहेत. या गोंधळामुळे हे सरकार किती दिवस चालेल याची शास्वती नाही. परंतू ता. एक जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार हे नक्की, अशा शब्दात नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला.

कंधार तालुक्यातील बोरी (बुद्रुक) येथे गुरुवारी (ता. २७) श्री महादेव मंदिर परिसराच्या पाच कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुखेड, कंधारचे आमदार डॉ. तुषार राठोड, उपनगराध्यक्ष मोहम्मंद जफरोद्दीन, शासकीय कंत्राटदार सुमित मोरगे, राम सावकार मुखेडकर, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, बाबुराव केंद्रे, कृष्णा पापीनवार, शंकर नाईक, भालचंद्र नाईक यांची उपस्थिती होती.
             
हेही वाचा - समाजातील नवा आदर्श : गौरी ऐवजी जिजाऊ- सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन, कुठे ते वाचा?

कोणीही विकासकामात खोडा घालू नये
खासदार चिखलीकर म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महादेव मंदिर विकासासाठी तीन कोटींचा निधी मंजुर केला होता. परंतू ते दुर्दैवाने पदावरून गेले आणि त्यांच्या जागी दुसरे मुख्यमंत्री आले, असे स्पष्ट करून त्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांनी तीन कोटींचा निधी रद्द केल्याचे सांगितले. मंदिर विकास कामात खोटे बोलणारे आणि निधी रद्द करणारे पदावर राहिले नाहीत. बोरीचा महादेव हे जाजवल्य देवस्थान आहे. यामुळे कोणीही विकासकामात खोडा घालू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही दोघे मिळून विकासकामे करणार             
आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, बोरी येथील महादेव मंदिर पूर्वी माझ्या मतदारसंघात असला तरी कंधार तालुक्यात असल्याने तत्कालीन आमदार चिखलीकर यांना विकासनिधी आणण्यासाठी अडचणी येत होत्या. परंतू आता ते नांदेडचे खासदार झाले आहेत. आता आमच्या दोघांच्याही मतदारसंघात हे महादेव मंदिर येत असल्याने केंद्राचा व राज्याचा विकास निधी आणून आम्ही दोघे मिळून विकासकामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी मी महादेव मंदिर रस्त्यासाठी पन्नास लाखाचा निधी दिला होता. पुढेही विकास कामासाठी निधी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Video-धुळे येथील मारहाण प्रकरणाचा नांदेडमध्ये निषेध, काय आहे कारण? 

यांची होती उपस्थिती
यावेळी प्राचार्य किशन डफडे, प्रकाश तोटावाड, बालाजी झुंबाड, देवानंद सांगावे, संभाजी केंद्रे, गोविंदराव शिंदे, श्रीराम पाटील, दिगंबर कावलगाव, सार्वजनिक बांधकामाचे उप अभियंता श्री. जोशी, विद्युत मंडळाचे उप कार्यकारी अभियंता वाघमारे, पाणीपुरवठ्याचे उप अभियंता डिकडे, शाखा अभियंता पवार, शाखा अभियंता केंद्रे, कंत्राटदार शिवराज पाटील कळकेकर, डॉ. संजय केंद्रे आदी उपस्थित होते. गजानन कावलगावे यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis to be sworn in as Chief Minister on January 1! Read who said ...., Nanded news