esakal | अर्धापुरात सत्ताधारी नगरसेवकात बेबनाव; माजी नगराध्यक्षांनी दाखविला काळा झेंडा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

डाॅ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे तात्काळ उभारण्याची मागणी

अर्धापुरात सत्ताधारी नगरसेवकात बेबनाव; माजी नगराध्यक्षांनी दाखविला काळा झेंडा

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : नगरपंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीच्या निमित्ताने सत्ताधारी नगरसेवकातील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला असून माजी नगराध्यक्षा प्रणिता सरोदे यांनी भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे पुतळे तात्काळ उभारण्यात यावे व मागील सर्वसाधारण बैठकीचे इतिवृत्त न मिळाल्याने प्रशासनाचा काळा झेंडा दाखवून प्रशासनाचा निषेध केला. निवडणूका काही महिण्यावर आली असतांना सत्ताधारी नगरसेवकच आंदोलनाच्या तयारीत असल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा सुरु आहे. तर विरोधी पक्षाचे चार नगरसेवक बैठकीला गैरहजर होते.

अर्धापूर नगरपंचायतीमध्ये काॅग्रेस सत्ताधारी असून गेल्या चार वर्षात नगरपंचायत या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. सत्ताधारी नगरपंचायतीत सत्ताधाऱ्यांमध्ये बेबनाव सातत्याने दिसून आला आहे. याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे. 

नगरपंचायतीच्या सभागृहात सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पंतप्रधान आवास  योजना, पाणी पुरवठा योजना, भूमिगत मलनित्सारण करणे, निलंबित कर्मचा-यांना पुन्हा कामावर घेणे आदी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीला नगराध्यक्षा सुमेरा बेगम, उपनगराध्यक्षा डाॅ पल्लवी लंगडे, निलोफर सिद्दीकी, यासमीन सुलताना, नामदेव सरोदे, नासेरखान पठाण, मुक्तेदरखान पठाण, गाजी काजी, फेरोज कुरेशी, आख्तरुल्ला बेग, शमीम बेगम आदी नगरसेवक उपस्थित होते. प्रभारी मुख्याधिकारी मारोतराव जगताप यांनी सभेचे प्रास्ताविक केले.

या बैठकीवर माजी नगराध्यक्षा प्रणिता सरोदे यांनी बहिष्कार टाकला. शहरातील प्रज्ञा बुध्द विहारात पुर्वीच्या ठिकाणी भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे तात्काळ उभारण्यात यावेत. तसेच मागील सर्वसाधारण बैठकीचे इतिवृत्त मिळाले नाही. त्यामुळे हे इतिवृत्त उपलब्ध करुन दिल्यानंतरच बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी प्रणिता सरोदे यांनी निवेदन दिले. तसेच प्रशासनाचा काळे कपडे परिधान करुन व काळा झेंडा दाखवून निषेध केला. नगरपंचायत स्थापन झाल्यापासून सत्ताधारी नगरसेवकाने अशा प्रकारे निषेध करण्याची पहिलीच वेळ आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण शहराच्या विकाससाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करत आहेत. तर सत्ताधारी नगरसेवकात मात्र बेबनाव दिसून येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे