डॉ. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे १४ जुलै रोजी वितरण

file photo
file photo

नांदेड - भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (कै) डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येत्या ता. १४ जुलै रोजी जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. 

पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून राज्यस्तरावर एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन नांदेडसह इतर ठिकाणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.  

शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष
‘पाणी अडवा, पाणी जिरवा'ची संकल्पना अंमलात आणणारे तसेच जलसंस्कृतीचे जनक म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येणाऱ्या माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने जलसंधारण, जलसंपदा व पाणी पुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्व. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

असे आहेत पुरस्कार
या पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाला पाच लाख रूपये व प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी तीन लाख, प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह तर तृतीय क्रमांकासाठी दोन लाख, प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह असे स्वरुप आहे. या पुरस्काराचे वितरण माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मदिनी येत्या ता. १४ जुलै रोजी करण्यात येणार आहे. 

पुरस्कारासाठी समिती गठीत
या पुरस्काराच्या निवडीसाठी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाचे प्रधान सचिव, लाभक्षेत्र विकासचे सचिव, यशदामधील जलसाक्षरता केंद्राचे संचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (पा.), जलसाक्षरता केंद्राने निवडलेले दोन जलनायक यांचा समावेश असून जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकासचे उपसचिव हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत. या पुरस्कार समारंभाचे आयोजन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीतील जलसाक्षरता केंद्राच्या मार्फत होणार असून त्यांच्यामार्फत पुरस्काराची नामांकने मागविण्यात येणार आहेत. या संबंधीचा शासन निर्णय ता. १२ जून रोजी काढण्यात आला आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com