नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केली वाळूमाफियांवर कारवाई

अभय कुळकजाईकर
Thursday, 14 January 2021

नांदेड जिल्ह्यात वाळू उपसा करण्यासाठी सातत्याने वाळू माफियांकडून प्रयत्न होत असतात. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाया केल्या होत्या. तराफे जप्त करून ते जाळले होते. तसेच वाहने आणि वाळू जप्त करण्यासोबतच वाळू माफियांवर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले होते.

नांदेड - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी (ता. १३) रात्री गोदावरी नदीच्या काठावर स्वतः उपस्थित राहून वाळू माफियांवर धाडसी कारवाई करत वीस वाहने जप्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत नांदेडचे उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस अधिकारी उपस्थित होते. बुधवारी संध्याकाळी सहा वाजता सुरू केलेली कारवाई रात्री दहा वाजताही सुरू होती.

नांदेड जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी, मन्याड, आसना या प्रमुख नद्यांसह इतरही नद्या असून त्यातील वाळू उपसा करण्यासाठी सातत्याने वाळू माफियांकडून प्रयत्न होत असतात. जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबत महसूल पथकाद्वारे कारवाईही करण्यात येत असते. मध्यंतरीच्या काळात वाळू माफियांनी बिहार राज्यातून मजूर मागवून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा सुरू केला होता. त्यावेळेसही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाया केल्या होत्या. तराफे जप्त करून ते जाळले होते. तसेच वाहने आणि वाळू जप्त करण्यासोबतच वाळू माफियांवर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले होते. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात वाळू उपसा कमी झाला होता. 

हेही वाचा - कोरोनाची संजिवनी परभणीत दाखल, शनिवारी दिली जाणार कोरोना लस 
 

वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया सुरू
दरम्यान, जिल्ह्यात एकूण २०२ वाळू घाट असून त्यापैकी देगलूर, बिलोली आणि माहूर तालुक्यातील एकूण ३२ वाळू घाटांच्या ई - लिलावाची प्रक्रिया नवीन वर्षात ता. दोन जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. सदरील प्रक्रिया ता. १७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे वाळू माफिया शांत राहतील, असे वाटत असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा वाळू माफियांनी डोके वर काढले. मात्र, या वेळी देखील आणखी जोरदार कारवाई करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला.  

हेही वाचलेच पाहिजे - अर्धापुरात दोघांची गळफास घेवून आत्महत्या,तर दिव्यांगाचा कालव्यात पडून मृत्यू

अचानक टाकले छापे   
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून काही वाळू माफियांनी नांदेड तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी अवैध आणि विनापरवाना वाळू उपसा सुरू केला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी बुधवारी सायंकाळी सहा वाजता महसूल अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलिस व आरटीओ विभागाला बोलावून अचानक छापे टाकून कारवाईला सुरूवात केली. 

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

वीस वाहने केली जप्त
नांदेड शहरालगत गोदावरी नदी काठावर असलेल्या थुगाव, बोंढार, पिंपळगाव कोरका या गावांना भेटी देऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पथकाने कारवाई केली. या कारवाईत १५ टिप्पर, तीन जेसीबी आणि दोन पोकलेन जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. बुधवारी रात्री दहा वाजताही ही कारवाई सुरू होती. मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे पुन्हा एकदा वाळू माफियांचे धाबे दणाणले असून त्यांच्यावर संक्रातच ओढावल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू झाली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector of Nanded Dr. Vipin takes action against sand mafia nanded sand news