हा जिल्हा २०२५ पर्यंत हिवताप मुक्त होणार 

शिवचरण वावळे
Thursday, 2 July 2020

देशभरात आरोग्य विभागापुढे हिवताप ही सर्वात मोठी आरोग्य समस्या बनली आहे. या आजारामुळे काही प्रमाणात जिवीत हाणीसोबतच देशाच्या अर्थिक विकासाला देखील बाधा पोहचत आहे. त्यामुळे जागतीक पातळीवरील काही विकसनशिल देश हिवताप आजाराचा प्रचार आणि प्रसार रोखण्यासाठी सातत्याने नवनवीन संकल्पना राबवत आहेत. आशियातील मालदीव आणि श्रीलंका सारख्या देशांना हिवतापीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे.

नांदेड : भारतीय किटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन २०१६ मध्ये दिल्लीत दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील जिल्हे हिवतापमुक्त करण्याचे उदिष्ट्ये ठेवण्यात आले आहे. यासाठी तीन टप्यात हा कार्यक्रम सुरु असून नांदेड जिल्हा हा दुसऱ्या टप्यात म्हणजेच सन २०२५ मध्ये हिवताप मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

आशिया पॅसीफीक विभागातील १८ देशांनी मिळुन नोव्हेंबर २०१५ मध्ये कोलालमपूर मलेशिया येथे घेतलेल्या बैठकीत तीन टप्यात हिवताप दुरीकरण धोरणाला भारत सरकारने पाठिंबा दिला आहे. पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांचा तर दुसऱ्या टप्यात २७ आणि तिसऱ्या टप्यात ३३ जिल्हे हिवतापमुक्त होणार आहेत. यासाठी राज्यातील २२ जिल्ह्यांचा २०२० चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्यातील नांदेडसह नाशिक, औरंगाबाद, पुणे, सातारा, धुळे, रत्नागिरी, जळगाव, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, जालना, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर व भंडारा या २७ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. 

हेही वाचा- कोरोना ब्रेकिंग - नांदेडला दिवसभरात सात पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३९८ वर​

नियोजन आराखडा तयार

ठरलेल्या उदिष्टांप्रमाणे जिल्हा हिवतापमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले असून, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी नियोजन आराखडा तयार केला आहे. यात हिवताप मुक्त गावे, हिवताप दुरीकरण आणि हिवताप नियंत्रणात राहणारे गावे अशी विभागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा- नांदेड जिल्हा परिषदेत आगळा वेगळा कृषीदिन साजरा ​

दिलेल्या वेळेतच जिल्हा हिवतापमुक्त होईल

त्यानुसार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांच्या मार्फत घरोघरी जाऊन भेटीद्वारे तापीचे सर्वेक्षण, रक्त नमुने घेणे, डासांच्या अळ्या नष्ट करणे, क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळ्यांचे वाटप, रुग्णांची व संशयीतांची रॅपीड टेस्टींग तपासणी, गाव, वाडी, तांडे वस्त्या, दुर्गम भाग याशिवाय महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन आरोग्य तपाणी केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या वेळेतच जिल्हा हिवतापमुक्त होईल अशी कामे सुरु आहेत. 

नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित​
आरोग्य खात्याच्या निर्देशानुसार जिल्हा २०२५ पर्यंत हिवताप या आजारातून मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे.    
-आकाश देशमुख (जिल्हा हिवताप अधिकारी)
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The District Will Be Free Of Malaria By 2025 Nanded News