डॉ. शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार डॉ. प्रभू गोरे यांना तर कै.सुधाकरराव डोईफोडे पुरस्कार धनंजय लांबे यांना जाहीर

प्रल्हाद कांबळे
Monday, 4 January 2021


संपादक वैजनाथ देशमुख, गोपाळ देशपांडे व मुन्तजीबोद्दीन यांनाही पत्रकार संघाचे पुरस्कार

नांदेड - मागील बारा वर्षापासून अखंडपणे देण्यात येणारे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले असून डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार औरंगाबादचे डॉ. प्रभू गोरे तर कै. सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार औरंगाबादचे धनंजय लांबे यांना जाहीर करण्यात आला असून ता. 5 जानेवारी रोजी होणारा हा सोहळा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला असला तरी लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा, ह्युमन राईट्स फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. यंदाचे हे तेरावे वर्ष आहे. या वर्षी डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार मागील अनेक वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत औरंगाबाद येथील डॉ. प्रभू गोरे, वृत्तपत्र क्षेत्रात आपल्या कार्यातून ठसा उमटवणारे औरंगाबाद येथील धनंजय लांबे यांना कै.सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार गोपाळ देशपांडे, लातूरच्या वैजनाथ देशमुख यांना स्व.अनिल कोकीळ सामाजीक पत्रकारिता पुरस्कार, मो.आरेफ खान पठाण यांना समीक्षा कर्तृत्व सन्मान पुरस्कार, ग्रामीण भागात लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे कंधारचे दिगंबर गायकवाड यांना डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार, वृत्तपत्र क्षेत्रासहीत राजकारणात सक्रिय झालेले नगरसेवक मुन्तजीबोद्दीन मुनीरोद्दीन यांना स्व. मिर्झा अहेमद अली बेग चुखताई पत्रकारिता पुरस्कार बजरंग शुक्ला यांना पंचनामाकार लक्ष्मणराव गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार, स्व.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार शहरातून चंद्रकांत घाटोळ, ग्रामीण भागातून माहूरचे तुळशीराम ठाकरे, सुनिल मुळे, संगणक चालक राज आडसकर, वृत्तपत्र क्षेत्रातील तिसरा डोळा फोटोग्राफर सिडकोचे सारंग नेरलकर, स्व.माधव अंबुलगेकर युवा पत्रकारिता पुरस्कार नईम खान तर स्व.सुरेश पटणे मुद्रण सेवा पुरस्कार सुनिल शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा - परभणी : महिलांना आर्थिक स्वातंत्र्याचे दारे उघडणाऱ्या सावित्रीच्या खऱ्या लेकी
सदरील पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश पांडे, माजी अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, माजी अध्यक्ष गणेश जोशी, कार्याध्यक्ष विश्वास गुंडावार, सहसचिव रविंद्रसिंघ मोदी, महानगराध्यक्ष रविंद्र कुलकर्णी, राजू पाटील, उपाध्यक्ष ज्ञानोबा पवार रूपेश पाडमुख यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Shankarrao Chavan Journalism Award Prabhu Gore and Late Sudhakarrao Doiphode Award to Dhananjay Lambe nanded news