डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावलौकीकाला साजेसे काम करा- आ. मोहन हंबर्डे

file photo
file photo

नांदेड : मराठवाड्याचे भगीरथ नेते व देशाचे माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने नांदेड येथे वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय कार्यान्वित आहे. जनसामान्यांची सेवा करणे हाच त्यांचा ध्यास होता. यासाठी त्यांच्या नावाला शोभेल असेच अधिकारी व कर्मचारी यांनी काम करावे असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार मोहन हंबर्डे यांनी केले.

महाविकास आघाडी सरकारने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार या महाविद्यालयाच्या देखरेखीसाठी अभ्यागत मंडळाची निर्मिती केली आहे. या मंडळाची पहिलीच बैठक डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केली होती. या बैठकीत बोलताना मोहन हंबर्डे यांनी स्वच्छतेसह रूग्णांच्या देखभालीकडे लक्ष देण्याची निर्देश दिले.

अभ्यागत मंडळाची बैठक सुरू होण्याआधी आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर व अभ्यागत मंडळाच्या सदस्यांनी रूग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. विविध विभागांना भेटी दिल्या. रूग्ण व नातेवाईक यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यानंतर महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये ही बैठक झाली.

बैठकीच्या प्रारंभीच वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील अडीअडचणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या उभारणीची मान्यता घेणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, नवीन प्रशासकीय ईमारत व ग्रंथालयाचे उद्घाटन करणे, नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, नर्सिंग होम, ट्रामा केअर सेंटर आदींची निर्मिती करणे. त्यासोबतच त्वचा व गुप्तरोग शास्त्र विभागाचे सीपीएस कोर्सेस सुरू करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेवून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी 19 कोटी रूपयांचे विद्यार्थी वसतीगृह मंजूर केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला. यावेळी अभ्यागत मंडळाचे सदस्य संतोष पांडागळे, डॉ. करूणा जमदाडे, अब्दुल हबिब, डॉ. दि. बा. जोशी, दिगंबर पवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणली. अभ्यागत मंडळासाठी स्वतंत्र कार्यालय निर्माण करून या माध्यमातून सामान्य रूग्णांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी संतोष पांडागळे यांनी यावेळी केली. त्यांच्या मागणीस समितीचे अध्यक्ष आ. हंबर्डे यांच्यास सर्व सदस्यांनी समर्थन दिले. एकूणच आजच्या पहिल्याच बैठकीत महाविद्यालय व रूग्णालयाच्या व्यवस्थापणाच्या सुधारणेसाठी चर्चा झाली. प्रारंभी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाविषयी प्रस्ताविकामधून माहिती सांगितली. या बैठकीस मंडळाचे सदस्य कल्पना शिरपुरे, रोहिदास जाधव, कैलास धोत्रे यांच्यासह सदस्य सचिव डॉ. वाय. एच. चव्हाण, डॉ. राजेश अंबुलगेकर, बालाजी डोळे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com