नियोजित दौऱ्याला विमानाचे ग्रहण

शिवचरण वावळे
Saturday, 23 May 2020

मागील पंधरा दिवसांपासून भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान विभाग (ICMR) चे आरोग्य पथक नांदेड जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात शनिवारी हे पथक नांदेडात दाखल होणार हे निश्चित झाले होते. परंतू, प्रवासाला निघण्यापूर्वीच विमानाच्या तांत्रिक अडचणीमुळे हे पथक नांदेडला दाखल होऊ शकले नसल्याची माहिती आहे. 

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील वाढते कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा सध्या आरोग्य विभागाच्या दृष्टीने संशोधनाचा विषय बनला आहे. याचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे एक पथक यापुर्वीही जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. पण तो दौरा लांबणीवर पडला, पुन्हा शनिवारी (ता.२३) दौऱ्याची चर्चा झाली. ही चर्चाही वांझोटीच ठरली, कारण प्रवासापूर्वीच विमानात तांत्रिक अडचण आल्याने पथकाचा दौरा दोन दिवस लांबणीवर पडला. 

आरोग्य पथक शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील कंटेटमेंट झोन परिसराची पाहणी करणार आहे. विशेष करुन इतवारा परिसरातील कंटेंटमेंट झोनची पाहणी करणार आहे. त्यानंतर हे पथक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना टेस्टींग लॅबची पाहणी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच आरोग्य विभागाच्या आत्तापर्यंतच्या कामाचा आढावा घेणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासदेखील आयसीएमआर विभागाचे पथक कधी येणार? या विषयी चिंता लागली आहे. तसेच हेच पथक नांदेडसह परभणी, बीड जिल्ह्याला भेटी देणार होते.  

हेही वाचा - नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा.... कसा तो वाचा

पंजाबने ठेवला होता नांदेडवर ठपका 
गुरुद्वाऱ्याच्या दर्शनासाठी पंजाबहुन नांदेडला आलेले भावीक लॉकडाउनमुळे शहरात अडकुन पडले होते. त्यांना घरी पाठविण्याकरिता राज्याने केंद्राकडे विशेष परवानगी मागुन अडकलेल्या तीन हजारापेक्षा अधिक प्रवाशांना पंजाब राज्यात सोडले होते. परंतु, नांदेडहून गेलेले प्रवासी पाच राज्याच्या सिमा ओलांडुन गेल्याने व भोपाळसारख्या रेडझोन परिसरात थांबल्याने अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्याचा ठपका नांदेडवर ठेवण्यात आला होता. 

हेही वाचा -  कोरोना अपडेट : नांदेडमध्ये आज तीन पॉझिटिव्ह, संख्या गेली ११९ वर

आरोग्य सुविधांचा घेणार आढावा 
गुरुद्वारा परिसरातील ९७ व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांची अर्धवट माहिती घेतल्याने यातील २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनास त्यांची शोधाशोध करण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. तेंव्हा कुठे १८ पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध लागला, परंतु यातील दोन पॉझिटिव्ह रुग्णांचा अद्यापही शोध न लागल्याने या दोन गंभीर विषयांवर पथक आरोग्य विभागाची चौकशी करणार असल्याचे समजते. 
या शिवाय आरोग्य पथकाकडून शहरातील तिन्ही शासकीय रुग्णालयांची पाहणी तसेच पंजाब भवन, यात्रीनिवास येथे असलेल्या आरोग्य सुविधांचा देखील बारकाईने आढावा घेणार असल्याचे समजते.  

विमानाच्या तांत्रिक अडचणीमुळे पथक आले नाही 
मुंबईहून भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान विभागाचे पथक शनिवारी नांदेडला दाखल होणार होते. परंतु, विमानाच्या तांत्रिक अडचणीमुळे पथक येथे दाखल होऊ शकले नाही.

- डॉ. सुरेश सिंह बिसेन, आरोग्य अधिकारी, महापालिका.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eclipse Of The Plane For The Planned Tour Nanded News