नांदेड जिल्ह्यातील बाभळी प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू

अभय कुळकजाईकर
Tuesday, 29 September 2020

बाभळी बंधाऱ्यात पाणी अडविण्याबाबत नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यासह राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत पत्रव्यवहार व चर्चा केली. नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन तसेच तेलंगणातील संबंधित विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता याबाबतच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे.

नांदेड - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बाभळी प्रकल्पाचे दरवाजे ता. २९ आक्टोंबरपर्यंत उघडेच ठेवावे लागतात. मात्र, यंदा दमदार पाऊस झाल्यामुळे तसेच तेलंगणातील पोचमपाड प्रकल्पही शंभर टक्के भरल्यामुळे बाभळी प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या प्रधान सचिवांमध्ये पत्रव्यवहार आणि चर्चाही झाली आहे. त्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 

गोदावरी नदीवर नांदेड जिल्ह्यात बाभळी प्रकल्प आहे. या प्रकल्पात २.७४ टीएमसी (५६ दलघमी) पाणीसाठा होऊ शकतो. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीसाठा होऊ शकला नाही. यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील गोदावरी आणि तिच्या उपनद्यावर असलेले जायकवाडीपासून ते नांदेड जिल्ह्यातील बळेगाव बंधाऱ्यापर्यंत सर्व प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामुळे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

हेही वाचा - Video - नांदेड जिल्ह्यात आता उन्नीच्या प्रादुर्भावामुळे ज्वारी भुर्ईसपाट
 

प्रकल्प भरले तुडुंब
गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पातून तसेच माजलगाव प्रकल्पातून, पूर्णा नदीवरील निम्न दुधना प्रकल्पातून, येलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्पातून पूर्णा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. सद्यस्थितीत नांदेड शहरात पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. नांदेड शहराच्या खालच्या बाजूला तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणसुद्धा शंभर टक्के भरले आहे. तेथूनही दरवाजे उघडून नदीत विसर्ग सुरु आहे.  

आता निर्णयाची प्रतिक्षा
बाभळी बंधाऱ्यात पाणी अडविण्याबाबत नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यासह राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत पत्रव्यवहार व चर्चा केली. नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन तसेच तेलंगणातील संबंधित विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कार्यवाही देखील झाली. राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आणि तेलंगणातील प्रधान सचिव यांच्यात पत्रव्यवहार आणि चर्चाही झाली आणि ती सकारात्मक झाली आहे. त्यामुळे आता याबाबतच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे.
 
हेही वाचलेच पाहिजे -  खरीप हंगाम गेला, आता मदार रब्बी हंगामावर

पाणी अडविण्याची मागितली परवानगी 
तेलंगणातील पोचमपाड धरण शंभर टक्के भरले असून त्यातूनही विसर्ग सुरू असून ते पाणी समुद्राला जाऊन मिळणार आहे. त्यामुळे पाणी वाया जाऊ नये, यासाठी बाभळी बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी परवानगी मागण्यात आली आली आहे. यंदाच्या वर्षी पोचमपाड धरणात आत्तापर्यंत पाच हजार ३११ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर पोचमपाड धरणातूनही तीन हजार ६१६ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली असून त्याचा फायदा महाराष्ट्रासह तेलंगणालाही होणार आहे. 
- एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts are underway to divert water from the Babhli project in Nanded district, Nanded news