esakal | वयोवृद्ध महिलेनी मृत्यूशी झुंज देत केली कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनाची बाधा झालेल्या एका ६५ वर्षीय महिलेने तब्बल २६ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर कोरोनावर मात केलीच. सोमवारी अहवालात सहा व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने आता जिल्ह्यातील संख्या २६२ वर पोचली आहे. आतापर्यंत एकूण १७७ व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.

वयोवृद्ध महिलेनी मृत्यूशी झुंज देत केली कोरोनावर मात

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - जुन्या नांदेडमधील गाडीपुरा भागातील ६५ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेने मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार असतानाही मृत्यूशी झुंज देत अखेर २६ दिवसानंतर कोरोनावर मात केली. सोमवारी (ता. १५) कोरोनामुक्त झाल्यानंतर तिचे जोरदार स्वागत करत रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

नांदेड शहरात कोरोनाचे रुग्ण अजूनही सापडत असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. मात्र, अशा परिस्थितीत कोरोनाची बाधा झालेल्या एका ६५ वर्षीय महिलेने तब्बल २६ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर कोरोनावर मात केलीच. सोमवारी (ता. १५) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात सहा व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने आता जिल्ह्यातील संख्या २६२ वर पोचली आहे. आतापर्यंत एकूण १७७ व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.

हेही वाचा - कोरोनामुक्त झालेले पालकमंत्री साधणार प्रशासनाशी संवाद

डॉक्टरांनी केले प्रयत्न
गाडीपुरा भागातील ६५ वर्षीय महिलेला कोरोना झाल्यामुळे ता. १९ मे रोजी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाली होती. तिला तपासणीनंतर तिच्या दोन्ही फुफ्फुसात गंभीर न्युमोनिया संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला श्‍वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे तिला कृत्रिम श्‍वासोश्‍वास देण्यात येत होता. औषधवैद्यकशास्त्र विभागातील डॉ. भुरके, डॉ. शीतल राठोड, डॉ. विजय कापसे, डॉ. उबेदुल्लाखान आणि डॉ. कपिल मोरे यांच्या पथकाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आणि योग्य त्या औषधोपचारामुळे २६ दिवस मृत्यूशी झुंज देऊन ती महिला सोमवारी (ता. १५) कोरोनामुक्त झाली. 

तीन जणांची प्रकृती गंभीर
सोमवारी अहवालात आलेल्या या सहा बाधितांपैकी एक पुरुष नांदेडमधील बरकतपुरा येथील ३२ वर्षांचा आहे. उर्वरित पाच बाधित व्यक्ती मुखेडमधील विठ्ठल मंदिर येथील असून बाधितांपैकी तीन पुरुष वय वर्षे अनुक्रमे ४७, ५२ व ६२ आहेत. दोन महिला ५२ व ५५ वर्षाच्या आहेत. सोमवारी (ता. १५) प्राप्त झालेल्या ५६ अहवालांपैकी ४१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सद्यःस्थितीत ७२ बाधित व्यक्तींवर औषधोपचार चालू असून त्यातील तीन बाधितांमध्ये ५२ वर्षांची एक महिला आणि ५२ व ५४ वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडकरांना सोमवारी साखर झोपेतच धक्का, सहा पॉझिटिव्ह

७२ जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात ७२ बाधित व्यक्तींपैकी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १८, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४२, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे सात बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून पाच बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. सोमवारी (ता. १५) ३४६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल मंगळवारी (ता. १६) सायंकाळीपर्यंत प्राप्त होतील.


कोरोनाविषयी संक्षिप्त माहिती

 • सर्वेक्षण ः एक लाख ४५ हजार ३२३
 • घेतलेले स्वॅब ः पाच हजार २९८
 • निगेटिव्ह स्वॅब ः चार हजार ४००
 • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या ः सहा
 • एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती ः २६२
 • स्वॅब तपासणी अनिर्णित संख्या ः दोनशे
 • स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या ः ८३
 • मृत्यू संख्या ः १३
 • रुग्णालयातून सुटी दिलेली संख्या ः १७७
 • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती ः ७२
 • स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची संख्या ः २७९
loading image