निवडणूक आयोग - लोकशाहीच्या सर्वागीण विकासासाठी नैतीक बाबींवर जोर

प्रल्हाद कांबळे
Sunday, 20 September 2020

निवडणूक आयोगाने 11 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. यानुसार आता संबंधित उमदेवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी जर एखादाची गुन्हेगार पार्श्वभूमी असेल तर त्याबाबत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर तपशील द्यावा, असे स्पष्ट केले आहे.

नांदेड  :  भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमदेवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सुधारीत सुचना निर्गमीत केल्या आहेत. यापूर्वी 10 ऑक्टोंबर 2018 व 6 मार्च 2020 रोजी निर्देश निर्गमीत केले होते. त्याच्या तपशीलावर सूचनांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 11 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. यानुसार आता संबंधित उमदेवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी जर एखादाची गुन्हेगार पार्श्वभूमी असेल तर त्याबाबत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर तपशील द्यावा, असे स्पष्ट केले आहे.

हा तपशील पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करावा लागेल याची पहिली प्रसिद्धी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या चार दिवसांमध्ये, दुसरी प्रसिद्धी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पाचव्या ते आठव्या दिवसामध्ये तर तिसरी प्रसिद्धी ही नवव्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच मतदान होण्याच्या दोन दिवस आगोदर पर्यंत करावी.

हेही वाचा शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी -

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबत तपशील प्रसिद्ध करतील 

बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांच्या संदर्भात निवडणूक आयोगाने आणखी स्पष्टता केली आहे. यात जे बिनविरोध विजयी उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांनी सुद्धा इतर उमेदवार व राजकीय पक्षासाठी निश्चित केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबत तपशील प्रसिद्ध करतील.

नामनिर्देशीत करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजे

आयोगाने ठरविल्यानुसार भागधारकांमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला आहे. यात आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचना व प्रारुपे यांचे एक संकलन प्रसिद्ध केले जाईल. यासंदर्भातील सर्व सूचना गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आणि त्यांना नामनिर्देशीत करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission - Emphasis on ethical issues for the overall development of democracy nanded news