esakal | नांदेडला महापौर, उपमहापौरपदासाठी लवकरच निवडणूक... 
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड वाघाळा महापालिका

नांदेडला महापौर आणि उपमहापौरपदाची लवकरच निवडणुक घेण्यात येणार आहे. महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता असून यंदाचे महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या प्रवर्गातून दहा नगरसेविका निवडून आल्या असून त्यातील नऊ कॉँग्रेसच्या तर एक भाजपची आहे. त्यामुळे आता नऊ नगरसेविकांमध्ये चुरस असून त्यातील एक महापौर होणार आहे. 

नांदेडला महापौर, उपमहापौरपदासाठी लवकरच निवडणूक... 

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार आता लवकरच नांदेडच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाचीही निवडणुक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी याबाबतचा अहवाल औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना पाठवला आहे. 

नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची मुदत ता. ३० एप्रिल रोजी संपली होती. मात्र, कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे राज्य शासनाने मुदतवाढ दिली होती. आता राज्य शासनाने याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निवडणूक घेण्याचे आदेश दिले असून तसे पत्र महापालिका प्रशासनाला गुरुवारी (ता. दहा) प्राप्त झाले आहे. त्यानुसार लवकरच निवडणुक घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली. 

हेही वाचा - Video- परभणी : मराठा समाजातील आमदार, मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेश देणार नाही- संभाजी ब्रिगेड

महापालिकेत कॉँग्रेसचे जंबो बहुमत
नांदेड वाघाळा महापालिकेची आक्टोंबर २०१७ मध्ये निवडणुक झाली होती. त्यात एकूण ८१ जागांपैकी ७३ जागा कॉँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यानंतर भाजपला सहा तर शिवसेना आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. कॉँग्रेसचे जंबो बहुमत असून महापौर, उपमहापौर तसेच इतर सभापतींची पदेही कॉँग्रेसकडे आहेत. आॅक्टोबर २०१७ मध्ये निवडणूक झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौर यांना अडीच वर्षांचा कालावधी होता. त्यात पहिल्या सव्वा वर्षात कॉँग्रेसच्या शीला भवरे महापौर तर विनय गिरडे पाटील उपमहापौर होते. त्यानंतर सध्या दीक्षा धबाले महापौर तर सतीश देशमुख तरोडेकर उपमहापौर आहेत. त्यांची मुदत ता. ३० एप्रिल रोजी संपली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने मुदतवाढ दिली होती. आता राज्य शासनाने महापालिकेला निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - Video - नांदेड : युवा बागायतदाराने पानमळा शेती फुलवून उत्पन्नाने साधली प्रगती 

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रक्रिया
महापौर, उपमहापौर पदासोबत शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी, असे सांगितले आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने तसेच विभागीय आयुक्त हे तारीख आणि वेळ निश्‍चित करणार आहेत. त्यानुसार महापालिकेने विभागीय आयुक्तांना पत्रही पाठवले आहे. दरम्यान, यंदाचे महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव असून कॉँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. तसेच उपमहापौर पदासाठीही अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, कोणाची वर्णी लागणार? याबाबतचा निर्णय कॉँग्रेसचे पालकमंत्री अशोक चव्हाण हेच घेतील.