कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर- जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 28 July 2020

नांदेड महानगरासाठी 15 झोनची निर्मिती करुन सुमारे 460 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असून प्रत्येक झोनला स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी समन्वयासाठी देण्यात आला आहे.

नांदेड : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने घरनिहाय तपासणी मोहिमेस प्रारंभ केला आहे. नांदेड महानगरासाठी 15 झोनची निर्मिती करुन सुमारे 460 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असून प्रत्येक झोनला स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी समन्वयासाठी देण्यात आला आहे. ही मोहिम यशस्वी व्हावी यासाठी महानगरपालिका व महसुल यंत्रणा विशेष लक्ष देवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू नये या दृष्टीने सर्व प्रकारचे नियोजन झाले असून कोरोना बाधित व्यक्तींना प्राथमिक अवस्थेतच निदान करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार तात्काळ करता यावेत यावर आम्ही भर दिला आहे. यादृष्टीने पाच हजार ॲन्टीजेन टेस्ट किट्स आता उपलब्ध आहेत. या ॲन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून कोरोना तपासणी मोठया प्रमाणात करण्यात येवून मृत्यूचे सद्यस्थितीत जे प्रमाण वाढले आहे त्यावर आम्ही लवकर नियंत्रण मिळवू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचादुचाकी चोरट्यांकडून सहा दुचाकीसह साडेतीन लाखाचा ऐवज जप्त- नांदेड पोलिस

एक हजार 309 ग्रामपंचायतीसाठी सुमारे एक हजार 540 ग्रामविकास यंत्रणा /आशा वर्कर 

जिल्ह्यात एक हजार 309 ग्रामपंचायतीसाठी सुमारे एक हजार 540 ग्रामविकास यंत्रणा /आशा वर्कर यांच्यामार्फत सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून यांचे सनियंत्रण त्या- त्या बुथ लेव्हल ऑफिसर यांच्याकडे सोपविले आहे. प्रत्येक बुथनिहाय आरोग्य विषयक प्राथमिक सेवा सुविधा या त्या- त्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निहाय उपलब्ध आहेत. या सर्वेक्षणातून प्राथमिक स्तरावर असलेल्या संशयित रुग्णांची तात्काळ तपासणी करता यावी यासाठी प्राथमिक स्तरावर सुमारे तीन हजार ॲन्टीजेन टेस्ट किट्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तींना तात्काळ त्या-त्या तालुकानिहाय कोव्हीड सेंटरवर उपचारासाठी दाखल करण्यात येईल अशी माहिती डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

नेमून दिलेल्या भागातील दोनशे व्यक्तींचे ऑक्सीमिटर नोंद घेणे निश्चित

सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर दोन हजार व्यक्तींच्या तपासणीची व त्यांच्यावर देखरेखीची जबाबदारी देण्यात आली असून प्रत्येकानी दररोज किमान त्यांच्या नेमून दिलेल्या भागातील दोनशे व्यक्तींचे ऑक्सीमिटर नोंद घेणे निश्चित केले आहे. या सर्व व्यक्तींना आरोग्य सुरक्षितेच्यादृष्टिने मास्क, सॅनिटायझर, शिल्ड आदि साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. याचबरोबर प्रत्येक तालुक्याला किमान तीन स्वॅब टेस्टींग व्हॅन उपलब्ध केल्या आहेत. एखादया भागात/गावात कोरोना बाधित व्यक्ती आढल्यास त्यांच्यासाठी प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र तीन बसेस तत्पर ठेवण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emphasis on house wise survey to prevent death rate of Corona victims Vipin nanded news