ग्रामपंचायत निकालाआधीच नांदेड जिल्ह्यातील अनेकांची डोकी फुटली; पन्नासहून अधिकजणांवर गुन्हा दाखल

file photo
file photo

नांदेड : सर्वच राजकीय पक्षाचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानानंतर गावातील मतदार, उमेदवारांनी एकमेकांची उणीदुणी काढत चक्क एकमेकांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अनेक जणांची डोकी फुटली तर काहीना जबर दुखापत झाली आहे. जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयासह विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही गावात पोलिसांनी तंबु लावले आहेत.

जिल्ह्यात शुक्रवार ( ता. 15 ) जानेवारी रोजी ग्रामपंचायतसाठी मतदान पार पडले. मतदार व उमेदवारांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. एकमेकांच्या परस्परविरुद्ध उमेदवार उभे केल्याने ग्रामीण भागात तणावाचे वातावरण होते. पोलिस बंदोबस्तात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. मात्र आपल्या विरोधात उमेदवार उभा केला, आमच्या पॅनेलला मतदान केले नाही याचा राग मनात धरुन गावातून मतपेट्या व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, पोलिस कर्मचारी बाहेर पडताच चक्क मतदार व उमेदवारांचे नातेवाईक समोरा- समोर आले. यात एकमेकांवर दगडफेक, लाठीकाठी व खंजरचा वापर करुनमारहाण करण्यात आली. यात अनेकांची डोकी फुटली तर काहींना जबर दुखापत झाली. विशेष करुन यात महिलांनाही याची झळ सोसावी लागली. 

बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथे जबरदस्त दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात जवळपास सत्तावीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुतन्याळ या गावात सध्या तणावपूर्ण परिस्थिती असून सोमवारी (ता. १८) निकालानंतर कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून पोलिस तळ ठोकून आहेत.

दुसऱ्या घटनेत सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानापूरी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या फिर्यादीवरुन मंगेश कदम, अच्युत कदम, अवधूत कदम, सचिन कदम, गणपत कदम, शंकर कदम, बळी कदम, हनुमंत येवले आणि विकास कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक करुन प्रतिबंधात्मक कारवाई केली त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

तिसऱ्या घटनेत उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आमदार शामसुंदर शिंदे यांच्या गावात चक्क दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी हनुमंत गायकवाड, नागोराव गायकवाड, किरण गायकवाड, सचिन शिंदे, संभाजी मंदावाड, विजय मंदावाड आणि वैभव मंदावाड यांच्याविरुद्ध उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मनाठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळसा येथे दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली. यावेळी खंजर ने एकाचा कान तोडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी गजानन मस्के, संतोष मस्के, अंतेश्वर हराळे यांच्याविरुद्ध मनाठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com