esakal | बळीराजाची चाड्यावर मूठ; कुरुळा परिसरात खरिपाच्या पेरणीला सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्याची चाड्यावर मुठ

बळीराजाची चाड्यावर मूठ; कुरुळा परिसरात खरिपाच्या पेरणीला सुरवात

sakal_logo
By
विठ्ठल चिवडे

कुरुळा ( जिल्हा नांदेड ) : मान्सूनपूर्व आणि तद्नंतर झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झाला असून कुरुळा परिसरात खरिपाच्या पेरणीला सुरवात झाली आहे. बळीराजाने आता तिफणीच्या चाड्यावर बियाण्यांची मूठ ठेवत पेरणीचा श्रीगणेशा केला आहे.

कुरुळा परिसरात आतापर्यंत २५६ मी.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मान्सून आगमनापूर्वीच मृग नक्षत्राच्या अगोदर जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने जमिनीत बऱ्यापैकी ओल निर्माण झाली होती. दरम्यान मान्सूनचे आगमन झाले आणि पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसापासून कपाशी लागवडीला वेग प्राप्त झाला आहे. कोरडवाहू क्षेत्र जादा असल्याने प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी यासह आंतरपिके म्हणून तूर, मूग, उडीद, तीळ, कारळ या पिकांचीही लागवड केली जात आहे.

हेही वाचा - बचतगटाची मिटींग संपवून जाणाऱ्या एका व्यक्तीला दोन दरोडेखोरांनी मारहाण करुन, बंदुकीतून फायरींग करून त्याच्याजवळील 57 हजार रुपये लुटल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी 10 वाजता मिल्लतनगर भागात घडला आहे.

मागील हंगामाचा वचपा किमान या हंगामात तरी भरुन काढता येईल या अपेक्षेने बळीराजा महागडी बियाणे काळ्या मातीत ओतून खिसा रिकामा करताना दिसत आहे. पारंपरिक बैलजोडीच्या सहाह्याने पेरणी करण्यापेक्षा यांत्रिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करण्यावर अधिकचा भर राहणार आहे. सोमवारी (ता. १३) रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे पेरणीत काहीसा खंड पडला असून पावसाने पुढील दोन दिवस उघडीप दिल्यास पेरणीचा वेग वाढणार आहे. खत बियाण्यांचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले असून विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

येथे क्लिक करा - माहूरचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे आणि त्यांच्या सहकारी अंमलदारानी माहूरजवळ असलेल्या विक्की ढाब्यावर मंगळवारी (ता. १५) पहाटेच्या सुमारास धाड टाकली.

पेरणीआधी तण नियंत्रणावर भर

पेरणीआधी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाला असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीत तणांची निर्मिती झाली असून तणाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतीत विविध तणनाशकांचा वापर करताना दिसत आहेत. त्यासंदर्भात कुठल्याही मार्गदर्शक सूचना संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांना मिळाल्या नसून रासायनिक तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image