esakal | बांबू व रेशीम लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे- कृषी विभाग
sakal

बोलून बातमी शोधा

बांबू लागवडीसाठी पुढे यावे

बांबू व रेशीम लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे- कृषी विभाग

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : बांबू व रेशीम लागवड मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन मंगळवार (ता. 15) जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने यांची प्रमुख उपस्थिती राहील. या मार्गदर्शन कार्यशाळेची नोंदणी सकाळी साडेनऊ ते 10 वाजेपर्यंत होईल.

कार्यशाळेत तांत्रिक मार्गदर्शनात माजी आमदार पाशा पटेल हे बांबू लागवडीतून पर्यावरण, जळगावचे बांबू अभ्यासक संदीप माळी हे बांबू रोपवन आणि रोपवाटिका व्यावसायिक संधी, रेशीम संशोधक डॉ. सी. बी. लटपटे हे रेशीम लागवडीतून व्यावसायिक संधी तर लातूरचे संजीव करपे हे बांबू व बांबूपासून इमारत बांधणे व फर्निचर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बांबु व्यवसायाचे फायदे या विषयावर शेतकरी मनोगत व्यक्त करतील तर शेवटी शंकेचे निरसन केले जाणार आहे.

हेही वाचा - वन विभागाकडून होत असलेल्या सुरक्षा कुंपणाचे काम निकृष्ट

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत व नवीन किक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. शेतकऱ्यास कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात तीन एकर तुती जोपासता येते. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 15 वर्षापर्यंत जिवंत राहत असल्याने दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकाप्रमाणे वारंवार येत नाही.

बांबू लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्वाचे घटक आहे. बांबूची शेती, लागवड कशी करावी, बांबू प्रजातीचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटामध्ये दरवर्षी आठ ते 10 नवीन बांबू तयार होत असतात. त्यामुळे बांबू लागवडीचे फायदे व रेशीम लागवड याविषयी मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, उपवनसंरक्षक एम. आर. शेख, उपजिल्हाधिकारी रोहयो अनुराधा ढालकरी यांनी संयुक्त केले आहे.

loading image