नांदेड जिल्ह्यात खरिपाची अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली

कृष्णा जोमेगावकर / अभय कुळकजाईकर
Thursday, 17 December 2020

कृषी उत्पादनाचा निकष निर्धारित करण्यासाठी राज्यात पीक पैसेवारी पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यात राज्य शासनाच्या कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून पिकांची पैसेवारी निश्‍चित करण्यात येते. दरवर्षी हंगामी पैसेवारी ता. ३० सप्टेंबर, सुधारित पैसेवारी ता. ३१ ऑक्टोबर; तर अंतिम पैसेवारी ता. १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन जाहीर करते. शासनाच्या ता. तीन नोव्हेंबर २०१५ च्या शासन आदेशानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारी पद्धतीचा आधार घेतला जातो.

नांदेड - जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. १५) जाहीर करून विभागीय आयुक्तांना सादर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली असल्याचा अहवाल सादर केला आहे. यापूर्वी प्राथमिक नजरअंदाज पैसेवारी पन्नास पैशाच्यावर तर सुधारित पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली जाहीर झाली होती. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते. अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली जाहीर झाल्याने दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.

कृषी उत्पादनाचा निकष निर्धारित करण्यासाठी राज्यात पीक पैसेवारी पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यात राज्य शासनाच्या कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून पिकांची पैसेवारी निश्‍चित करण्यात येते. शासन आदेशानुसार निर्धारित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाने ता. ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले होते. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्यावर जाहीर करण्यात आली. यानंतर शासन नियमानुसार सुधारित पैसेवारी ता. ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. यात मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले होते.

हेही वाचा - नांदेड : कर्जबाजारी शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या

खरिपाचे झाले होते मोठे नुकसान
यंदा सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे काढणी पूर्व तसेच काढणी पश्चात पिकांची नासाडी झाली होती. यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ५६५ कोटींचा निधी मंजूर करुन त्यातील २८२ कोटींचा पहिला हप्ताही वितरीत केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते. यानंतर विमा मंजूरीची आशा शेतकऱ्यांना आहे. 

अंतिम पैसेवारी जाहीर 
जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. १५) अंतिम पैसेवारी जाहीर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली असल्याचा अहवाल जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले आहे. जिल्ह्यातील एकूण एक हजार ५६२ गावांतील आठ लाख ४२ हजार ८६७ हेक्टर लागवडीलायक क्षेत्रापैकी सात लाख ८५ हजार ३३ हेक्टरवर पेरणी झालेल्या पिकांची कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून अंतिम पैसेवारी निश्‍चित करण्यात आली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या चोरीच्या घटना, लाखोंचा ऐवज लंपास, चोरट्यांचे पोलिसांना आव्हान

तीन टप्प्यांत होते पैसेवारी
दरवर्षी हंगामी पैसेवारी ता. ३० सप्टेंबर, सुधारित पैसेवारी ता. ३१ ऑक्टोबर; तर अंतिम पैसेवारी ता. १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन जाहीर करते. शासनाच्या ता. तीन नोव्हेंबर २०१५ च्या शासन आदेशानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारी पद्धतीचा आधार घेतला जातो.

जिल्ह्यातील तालुकानिहाय अंतिम पैसेवारी
(पैसेवारी पैशात)
नांदेड - ४७, अर्धापूर - ४८, कंधार - ४३, लोहा - ४५, भोकर - ४८, मुदखेड - ४६, हदगाव - ४९, हिमायतनगर - ४५, किनवट - ४८, माहूर - ४८, देगलूर - ४८, मुखेड - ४८, बिलोली - ४८, नायगाव - ४८, धर्माबाद - ४७, उमरी - ४६.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The final percentage of kharif in Nanded district is below fifty paise, Nanded news