नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या चोरीच्या घटना, लाखोंचा ऐवज लंपास, चोरट्यांचे पोलिसांना आव्हान

प्रल्हाद कांबळे
Thursday, 17 December 2020

या प्रकरणी कुंटुर, किनवट, नांदेड ग्रामिण आणि लोहा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या चार चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी या चोऱ्यामध्ये लाकोंचा माल लंपास केला आहे. या प्रकरणी कुंटुर, किनवट, नांदेड ग्रामिण आणि लोहा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नायगाव तालुक्यातील बरबडा येथील बाजार समितीच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ता. १४ डिसेंबर ते १६ डिसेंबरच्या दरम्यान सोयाबीनचे ६८ पोते ज्याची किंमत एक लाख ४२ हजार ८०० रुपये असा माल चोरुन नेला. शेतकरी मोहन किशन पंचलिंग यांच्या फिर्यादीवरुन कुंटुर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. जांभळीकर करत आहेत.

हेही वाचा - नांदेड : मोबाईल शाॅपी फोडून, आपली मोबाईल शाॅपी चालविणारी टोळी जेरबंद, लाखोंचा ऐवज जप्त, भाग्यनगर पोलिसांची कारवाई -

किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा

दुसऱ्या घटनेत किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील शाहूनगरमध्ये राहणाऱ्या निलाबाई गरुड यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून कपाटातील सोन्याचे दागिने व नगदी रुपये, एक एलईडी टीव्ही, टेबल फॅन असा एकूण एक लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी निलाबाई गरुड यांच्या फिर्यादीवरुन किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास फौजदार श्री पवार करत आहेत.

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा 

तिसऱ्या घटनेत नांदेडपासून जवळच असलेल्या धनेगाव शिवारात शेख हमिद अहमद यांच्या सीमेंट खांब व इतर साहित्य तयार करणाऱ्या प्लांटवरील सिमेंट पोल, फिनिशिंग, लोखंडी फ्रेम असा ५९ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी शेख हमीद यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार श्री मुपडे करत आहेत.

येथे क्लिक करापरभणी शहरात नवीन नळजोडणीसाठी कृती आराखड्याची गरज 

लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा

तर चौथ्या घटनेत लोहा येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून महानंदा हाके या महिलेने तिच्या बँक खात्यातून पंचवीस हजार रुपये काढून पिशवीमध्ये ठेवून ती घराकडे जात होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी तिची नजर चुकवून तिच्या पिशवीतील पंचवीस हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी महानंदा हाके यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. सोनटक्के करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Various thefts in the district, lakhs of rupees stolen, thieves challenge police nanded news