चलतीका नाम गाडी; पहिल्याच दिवशी नांदेड आगाराला सहा लाखावर कमाई 

शिवचरण वावळे
Friday, 21 August 2020

प्रवाशांच्या ध्यानी मनी नसताना अचानक बुधवारी (ता.१९) एसटी जिल्ह्याबाहेर धावणार असल्याचा शासनाने आदेश काढला. घरापासून दूर अडकलेल्या प्रवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गुरुवारी (ता.२०) पाऊस असताना देखील महामंडळाची बस मार्गस्थ झाली. कुणाचा विश्‍वासही बसणार नाही अशी नांदेड आगाराने घसघशीत कमाई केली.

नांदेड : नांदेड विभागातील विविध आगारातून  गुरुवारी (ता.२०) २०० बसेसचे नियोजन करण्यात आले होते. अनेक तालुक्यातून जाणाऱ्या बसेसला पावसाचा अडथळा देखील आला. मात्र लालपरीने इतर मार्गाचा अवलंब करत जिल्ह्याबाहेर धाव घेतली. १८३ नियते चालविण्यात आली. दिवसभरात ७९३ फेऱ्या पूर्ण केल्या.

लॉकडाउन दरम्यान लालपरीला जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली गेली तेव्हा सुरुवातीच्या चार दिवसापर्यंत चार रुपये प्रतिकिलो मिटर इतके कमी उत्पन्न मिळत होते. परंतू हळुहळु हे उत्पन्न १८ रुपयापर्यंत वाढले आहे. गुरुवारी (ता.२०) सुरु झालेल्या एसटीला पहिल्या दिवशी १८ हजार ९०० प्रवाशांनी बसचा प्रवास केला. मात्र यापेक्षा जास्त प्रवाशांची एसटीला अपेक्षा होती. पहिल्या दिवशी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला तरी, त्यावर नांदेडआगाराला  समाधान मानावे लागले.  

हेही वाचा- सचखंड गुरुद्वारा बोर्ड : सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीसांना फटकारले, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ​

आज लांब पल्ल्याच्या २३ गाड्या परतणार

नांदेड विभागातून गुरुवारी सोडण्यात आलेल्या १८३ बसपैकी २३ बसेस ह्या लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे २३ बसेस शुक्रवारी (ता.२१) सायंकाळपर्यंत परतणार आहेत. असे असले तरी, लांब पल्ल्याच्या बसेसेचे उत्पन्न सोडून केवळ १६० बसेसच्या माध्यमातून महामंडळास पाच लाख ९१ हजार ९९६ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. लांब पल्ल्याच्या २३ गाड्या परतल्यानंतर या उत्पन्नात दोन ते आडीच लाख रुपये इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८३ गाड्यांच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी नांदेड विभागास साडेआठ लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील पुन्हा २०० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.  

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; ११५ जण पाझिटिव्ह ​

लांब पल्ल्यांच्या बसकडून २० हजार उत्पन्न मिळणे अपेक्षित 
लांब पल्ल्यांच्या एका बसच्या माध्यमातून किमान २० हजार रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. परंतू पहिल्या दिवशी पाच हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळत आहे. शनिवारी श्रीगणेश चतुर्थी असल्याने व रविवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे महामंडळास कमी उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याने काही प्रमाणात बसफेऱ्या कमी करण्यात येणार आहे.
-अविनाश कचरे - विभागीय नियंत्रक अधिकारी  

   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On The First Day Of Chalatika Naam Gaadi Nanded Depot Earned Over Rs 6 Lakh Nanded News