अभियांत्रिकी पदविकासाठी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु

अभय कुळकजाईकर
Tuesday, 11 August 2020

प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक प्रवेश सुविधा केंद्रावर खबरदारीचा उपाय म्हणून प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) जारी करण्यात आली असून त्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेली मार्गदर्शक तत्वे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

नांदेड - अभियांत्रिकी पदविका (इंजिनिअरींग डिप्लोमा) प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया - २०२० सुरु करुन ती सुरळीत पार पाडण्यासाठी कोरोनाच्या परिस्थितीशी सुसंगत अशी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सहसंचालक, नोडल अधिकारी, सर्व प्रवेश सुविधा केंद्रांचे प्राचार्य व केंद्र समन्वयक यांची ऑनलाईन कार्यशाळा डॉ. अभय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. आठ आॅगस्ट) आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत या प्रणालीची सविस्तर माहिती देण्यात आली.

या संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना नाव नोंदणी व आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी व त्याची पडताळणी करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. ज्यांच्याकडे संगणक आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे असे विद्यार्थी घरुनच आपला अर्ज भरुन सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करु शकतील. कागदपत्रांची पडताळणी पण ऑनलाईनच होईल. विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये विद्यार्थी आपला अर्ज मोबाईल किंवा संगणकावरून भरुन कागदपत्र अपलोड करणे व त्याची पडताळणी करणे, यासाठी विद्यार्थ्याला जवळच्या सुविधा केंद्रावर जावे लागेल. जाण्याआधी सुविधा केंद्राचा उपलब्ध ‘टाईम स्लॉट’ ऑनलाईन पद्धतीने निवडावा लागेल.

हेही वाचा - दुसऱ्यांदा बोहल्यावर चढताच हातात बेड्या, कुठे ते वाचा?

प्रवेश सुविधा केंद्रावर प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी)
प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक प्रवेश सुविधा केंद्रावर खबरदारीचा उपाय म्हणून प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) जारी करण्यात आली असून त्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेली मार्गदर्शक तत्वे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. यानुसार सर्व सुविधा केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी, प्रवेशासाठी येणारे विद्यार्थी व त्यांचे पालक या सर्वांनी मास्कचा वापर करणे, हात सॅनिटाईज करणे, संस्थेच्या प्रवेश द्वारावर स्पर्शविरहित थर्मामीटर व ऑक्सिमीटरने तपासणी करणे, दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर राखणे हे बंधनकारक राहील.

हेही वाचलेच पाहिजे - ‘या’ गावात भरपूर दूध, पण दुधाचा एकही थेंब विकला जात नाही
 

प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी 
या सर्व बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यासाठी डॉ. गोरक्ष गर्जे (प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतनन बाबानगर, नांदेड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड हे एक प्रवेश सुविधा केंद्र म्हणून कार्यान्वयीत करण्यात आले असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी प्रवेशेच्छूक विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी घरी राहूनच आपला प्रवेश अर्ज भरुन सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाण्याची गरज पडल्यास पालकांनी पाल्याबरोबर जाण्याचे टाळावे, जेणेकरून सुविधा केंद्रावर गर्दी होणार नाही असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पाहण्यासाठी www.dtemaharashtra.gov.in किंवा www. gpnanded.org.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First year admission process for Engineering Diploma begins, Nanded news