नांदेडचा हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर, कोणता ते वाचा? 

file photo
file photo

नांदेड : येथील गोदावरी नदीच्या काठी वसलेले नांदेड हे प्राचीन शहर आहे. या शहरात गोदावरी नदीच्या उत्तर तटावर नंदगिरी नावाचा किल्ला आहे. आज किल्ल्याचे काही अवशेषच उरले आहेत. उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असूनही त्याकडे या विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने या किल्ल्याच्या मालकीच्या जागेवर महानगरपालिकेने पाण्याच्या दोन टाक्या आणि बंगले बांधून किल्ल्याचा उरलेला भागही गिळंकृत केल्याचे पहावयास मिळत आहे. किल्ल्यावरील पुष्कर्णीचे चुकीच्या पध्दतीने नुतनीकरण करण्यात आल्याचेही काही ऐतिहासिक किल्ल्याचे अभ्यासक सोशल माध्यमातून बोलत आहेत

नांदेड शहराच्या जुन्या भागातील अरब गल्लीत गोदावरीच्या पात्रा लगत उरलेले किल्ल्याचे अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नांदेड जिल्ह्यातील पुरातत्व विभाग नेमके कशआचे संगोपन करते हा संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे एखादा सराईत गुन्हेगार एखाद गंभीर गुन्हा करुन लपून   बसतो तशाच पध्दतीने हे कार्यालय असल्याचे सांगण्यात येते. अनेकांना तर माहितच नाही की या विभागाकडे ऐतिहासिक वस्तुचे संगोपन व देखभाल दुरुस्ती असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनेक महत्वाच्या बैठकांना पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसतात. 

नंदगिरी किल्ल्याचा इतिहास

नंदीतट, नंदीनगर, नंदीग्राम इत्यादी नावाने इतिहासात प्रसिध्द असलेले हे नगर नंद वंशातील राजाने वसवलेले होते. पैठण ही नंदवंशाची दक्षिण भारतातली राजधानी होती. तर नंदआहार आणि नवनंदडेरा ही उपराजधानी होती. याच नवनंदडेरा या नावाचा अपभ्रंश होऊन नांदेड हे आजचे नाव प्रचलित   झाले. नांदेड हे शहर उपराजधानी आणि व्यापारी केंद्र असल्याने त्याकाळी त्या शहराला संरक्षणासाठी तटबंदी असणार. नांदेड हा नगर किल्ला होता.   सातवहानांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौध्दपिठ होते. सांचीच्या स्तुपावरील दानलेखात त्याचा उल्लेख आहे. वाकाटक त्यानंतर चालुक्य ,राष्ट्रकुट    व गंग यांच्या काळात नांदेड हे प्रसिध्द शैक्षणिक केंद्र आणि वैभवशालीनगर म्हणुन प्रसिध्द होते. त्यानंतरच्या काळात बहामनी, मुघल आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत निजामाकडे हा किल्ला होता. 

किल्ला पहाण्याची ठिकाणे 

या भुईकोट किल्ल्याला दोन तटबंद्या होत्या. त्यात एकूण २४ बुरुज होते. त्यापैकी १४ बुरुज बाहेरच्या तटबंदीत तर १० बुरुज आतल्या तटबंदीत होते. त्यापैकी किल्ल्याचे तीन बुरुज आणि तटबंदी बाहेरुन दिसते. त्याच ठिकाणी नांदेड महानगरपालिकेने पाण्याच्या दोन टाक्या बांधलेल्या आहेत. त्या टाक्यांच्या दिशेने गेल्यावर किल्ल्याच्या सध्याच्या अवशेषांच्या आत आपला प्रवेश होतो. या ठिकाणी पाण्यांच्या टाक्यांच्या बाजूला किल्ल्याची माहिती देणारा फ़लक लावलेला आहे. पुढे गेल्यावर एक १५ फूट लांब, १२ फूट रुंद आणि १० फूट खोल पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे काही अलिकडच्या काळात बांधलेल्या वास्तूंचे अवशेष आहेत. ते अवशेष ओलांडून डाव्या बाजूला पुढे गेल्यावर नदीच्या काठावर एक बुरुज आहे. त्यावर छत्री बांधलेली आहे. बुरुजावरुन टेहळणी करणार्‍या टेहळ्यांचे ऊन- पावसापासून रक्षण होण्यासाठी याची रचना केलेली असावी. किल्ल्याच्या तटबंदीत आजमितीला आठ बुरुज उरलेले आहेत.

पोहोचण्याच्या वाटा

नांदेड शहरात अरब गल्लीत आहे. नांदेड शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने देशाशी जोडलेले आहे. महारष्ट्रातील सर्व महत्वाच्या शहरातून येथे एसटी तसेच खाजगी बसेस येतात. मुंबईहून नांदेडला येण्यासाठी नंदिग्राम, देवगिरी एक्सप्रेसने नांदेड गाठावे. नांदेडहून रिक्षाने अरब गल्लीत असलेल्या किल्ल्यापर्यंत जाता येते. किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. नांदेड शहरात अनेक हॉटेल्स आहेत. किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाही. 

किल्ल्याचे जतन करावे

नांदेडची ओळख असलेल्या नंदगिरी किल्ल्यामुळे आहे. नांदेड ते कंधार किल्ला हा भूयारी मार्ग होता. परंतु कालांतराने हा रस्ता बंद झाला. किल्ल्याची पडझड होत आहे. या बाबीकडे पुरातत्व विभाग व महापालिकेने लक्ष घालावे. किल्ला परिसरातील वाढते अतिक्रमण हटवावे व या परिसराचा विकास करावा अशी मागणीही करण्यात येत आहे.
- धनंजय वाघमारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com