मातृभाषेच्या जडणघडणीत व्याकरणाचा पाया भक्कम असणे आवश्यक- देवीदास फुलारी

प्रल्हाद कांबळे
Saturday, 3 October 2020

नांदेड जिल्हा मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम 2020 अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रथम भाषा मराठी या आभासी वर्गाच्या उद्‌घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

नांदेड : अध्ययन-अध्यापनात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवीन शैक्षणिक धोरणात याचा प्रामुख्याने विचार केला आहे. मातृभाषा समृद्ध आणि संपन्न करायची असेल, तर मातृभाषेचे व्याकरण शास्त्रशुद्ध असावे लागते. एकूणच मातृभाषेच्या जडणघडणीत व्याकरणाचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन साहित्यिक देवीदास फुलारी यांनी केले.

नांदेड जिल्हा मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम 2020 अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रथम भाषा मराठी या आभासी वर्गाच्या उद्‌घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते गुरुवारी (ता. एक) बोलत होते. यावेळी उद्‌घाटक म्हणून प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर तर अध्यक्ष म्हणून भागवत घेवारे आणि प्रमुख अतिथी म्हणून रंगनाथ सुंबे हे उपस्थित होते.

हेही वाचा गुड न्यूज : मराठवाड्यातून तीन रेल्वे धावणार, प्रवाशांना दिलासा -

भाषासुद्धा समृद्ध असली पाहिजे

यावेळी बोलताना फुलारी पुढे म्हणाले, आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे, अशा वातावरणात भाषासुद्धा समृद्ध असली पाहिजे. भाषा ही व्यवहाराची भाषा असून भावनेच्या प्रकटीकरणाचे मूर्त स्वरूपाचे साधन म्हणून तिच्याकडे पाहिले पाहिजे. अशावेळी व्याकरणाचे मापदंड महत्त्वाचे ठरतात अन्‌ ते अक्षर वाङ्‌मयाच्या सौंदर्यात भर घालतात. या कार्यक्रमात बोलताना व्याकरणाचार्य रंगनाथ सुंबे म्हणाले, शब्दांचा अर्थ जाणणे आणि शब्दभेद कळण्यासाठी शब्दांच्या जाती विचारात घेणे आवश्यक असते.

यांची होती उपस्थिती

उद्‌घाटक डॉ. अंबेकरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या तर अध्यक्षीय समारोपात भागवत घेवारे यांनी नांदेड जिल्ह्यातील अध्यापकांचे कौतुक केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या परीश्रमासाठी त्यांनी चंद्रकांत गायकवाड आणि शिवसांब कलयाण कस्तुरे यांचे विशेष अभिनंदन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शुभांगी तळणकर, डॉ. वैजयंती कस्तुरे, डॉ. कावळे मॅडम इ. विशेष परिश्रम घेतले. श्री कोकणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू श्री गायकवाड आणि श्री कल्याण कस्तुरे यांनी सांभाळली. या ऑनलाईन कार्यक्रमात महाराष्ट्रातील मान्यवर अध्यापक सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The foundation of grammar must be strong in the formation of mother tongue Devidas Fulari nanded news