नांदेड : गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 7 October 2020

चार हल्लेखोरांना सोमवारी (ता. पाच) अटक करुन मंगळवारी (ता. सहा) न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना सात दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे.

नांदेड : जुना मोंढा परिसरात गोळीबार करून एकाला जखमी करुन दहशत निर्माण करणाऱ्या चार हल्लेखोरांना सोमवारी (ता. पाच) अटक करुन मंगळवारी (ता. सहा) न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना सात दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह दोघे जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

रविवारी (ता. चार) सायंकाळच्या सुमारास अतिशय गर्दीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जूना मोंढा भागातील महाराजा रणजीतसिंह मार्केट परिसरात गुन्हेगारांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले होते. या गोळीबारात पानठेला चालक आकाशसिंह परीहार जखमी झाला होता. तीन दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी आपल्या पिस्तुलातून फैरी झाडत अक्षरशः धुमाकुळ घातला. एका व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून दहा हजार रुपये लुटले. 

हेही वाचा - किनवट : शेतकऱ्यांचे एक कोटी ७४ लाख रुपये खात्यावर होणार जमा- खा. हेमंत पाटील

अद्याप दोन आरोपी फरारच

घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. रात्रभर ‘सर्च ऑपरेशन’ करुन चार संशयित आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. या प्रकरणी एका व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आदर्श अनिल कामठीकर, धनराजसिंह उर्फ राणा दीपकसिंह ठाकूर, संजय किशन गुडमवार आणि विशाल गंगाधर तांबेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four accused in the shooting case have been remanded in police custody for seven days nanded news