नोकरीचे आमिष दाखवून साडेआठ लाखाची फसवणुक; किनवटमध्ये गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
Monday, 8 March 2021

पैसे घेतल्यानंतर कुठलीच नोकरी दिली नाही. तसेच पैशाची मागणी केली असता पैसे देण्याची टाळटाळ करु लागले.

नांदेड : गोकुंदा (ता. किनवट) येथील एका सेवानिवृतास विश्वासात घेऊन तुमच्या मुला- मुलींना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बळजबरीने साडेआठ लाख रुपये वसूल करुन नोकरी न लावता विश्वासघात करणाऱ्या दोघांविरुद्ध किनवट पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरुन रविवारी (ता. सात) मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फसवणुकीचा प्रकार 13 जुलै 2016 रोजी झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोकुंदा (ता. किनवट) येथील सेवानिवृत्त रेणूराव संभाजी मुनेश्वर (वय 65) यांना माहूर तालुक्यातील शिंदगी (मो) येथील विठ्ठल नामदेव हिंगे (वय 40) आणि त्याचा सहकारी सुर्यकांत शंकर दुधाने (वय 50) राहणार छत्रपती वार्ड क्रमांक 57 अमरावती, जिल्हा अमरावती या दोघांनी विश्वासात घेतले. आमच्या मोठ्या साहेब लोकांच्या ओळखी आहेत असे सांगून तुमच्या मुला- मुलींना नोकरी लावतो असे सांगून साडेआठ लाख रुपये बळजबरीने व जुलमाने वसूल केले.

पैसे घेतल्यानंतर कुठलीच नोकरी दिली नाही. तसेच पैशाची मागणी केली असता पैसे देण्याची टाळटाळ करु लागले. सूर्यकांत दुधाने याने तर चक्क मी आमदार रवी राणा यांचा माणूस आहे. तुला काय करायचे ते करुन घे पैसे, परत मिळणार नाहीत. एवढेच नाही तर पोलिस कारवाई केली तर तुला खतम करुन टाकतो असे धमकी दिली. या प्रकरणात किनवट पोलिसांनी त्याला मदत केली नाही. शेवटी त्याने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने या प्रकरणात सर्व कागदपत्रे व पुरावे तपासून अखेर किनवट पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावरुन रेणूराव मुनेश्वर यांच्या तक्रारीवरुन किनवट पोलिस ठाण्यात विठ्ठल हिंगे आणि सूर्यकांत दुधानेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार श्री राठोड करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of Rs 8.5 lakh by showing job lure; Filed a crime in Kinwat nanded news