जवान पोचीराम सुद्देवाड यांच्या पार्थिवावर मंगरुळला अंत्यसंस्कार

नांदेड - जवान पोचीराम सुद्देवाड यांच्या पार्थिवावर मंगरुळला अंत्यसंस्कार करण्यात आले.
नांदेड - जवान पोचीराम सुद्देवाड यांच्या पार्थिवावर मंगरुळला अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिमायतनगर - मंगरूळ (ता. हिमायतनगर) येथील रहिवासी तथा जम्मू काश्मीरमधील सोपीया येथे कार्यरत असलेले केंद्रीय राखीव दलातील जवान पोचीराम सुद्देवाड (वय ५२) यांचे जम्मू काश्मीरमध्ये शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी (ता. एक) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांचा मुळगावी मंगरूळ येथे गुरुवारी (ता. तीन) सकाळी दहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुदखेडच्या केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) व नांदेड पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली.

मंगरूळ (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील जवान पोचीराम गंगाराम सुद्देवाड (वय ५२) हे गेल्या २० वर्षापासून देशाच्या विविध भागात केंद्रीय राखीव दलात सेवा बजावत होते. संवेदनशील असलेल्या जम्मू काश्मीरमधील सोपीया येथे ते सध्या देशसेवा बजावत होते. याच दरम्यान श्री. सुद्देवाड हे आजारी पडल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

उपचार सुरु असताना निधन
मंगळवारी (ता. एक) जवान पोचीराम सुद्देवाड यांची अचानक तब्येत बिघडली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव जम्मू काश्मीर येथून सेनादलाच्या विशेष विमानाने हैद्रराबाद येथे आणण्यात आले. हैदराबाद येथून सीआरपीच्या वाहनाने त्यांचा मुळगावी मंगरूळ येथे गुरूवारी आणण्यात आले. सकाळी दहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीआरपीएफ व पोलिसांनी दिली मानवंदना
यावेळी मुदखेड येथील सीआरपीएफच्या जवानांनी हवेत बंदुकीने गोळीबार करून मानवंदना दिली. नांदेड पोलिस दलानेही त्यांना मानवंदना दिली. मुलगा प्रणव यांनी त्यांचा चितेला भडाग्नी दिला. गावातील बळी खंदारे यांनी त्यांचा स्मारकास जागा दिली आहे. १९९१ बॅचमध्ये ते भरती झाले होते. ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्ह्यात कुस्तीपटू म्हणून त्यांचा लौकीक होता. 

अंत्यविधीला जनसमुदाय लोटला
यावेळी आमदार माधव पाटील जवळगावकर, तहसीलदार जाधव, सीआरपीएफ मुदखेडचे कमांडिग ऑफिसर रूपेश कुमार, पोलिस निरीक्षक प्राणसिंग, उपनिरीक्षक आनंद निखाते, हिमायतनगरचे पोलिस निरीक्षक भगवान कांबळे, सुभाष राठोड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, रफिक शेठ, परमेश्वर गोपतवाड, गणेश शिंदे, विजय वळसे, जनार्दन ताडेवार, संजय माने, सोपान बोपीलवार, खय्युम भाई यांच्यासह जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे. 

संपादन - अभय कुळकजाईकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com