कृष्णूरच्या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील जुगार, कुंटुर पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना केली अटक

प्रभाकर लखपत्रेवार
Thursday, 27 August 2020

सत्य गणपती मंदिराच्या आवारात जुगार खेळणाऱ्या सहा प्रतिष्ठितांना कुंटूर पोलिसांनी पकडले आहे.

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील सत्य गणपती मंदिराच्या आवारात जुगार खेळणाऱ्या सहा प्रतिष्ठितांना कुंटुर पोलिसांनी पकडले आहे. अनेकवेळा पोलीसांना गुंगारा देत असल्याने ता. २७ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान सापळा रचून पोलिसांनी जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कुष्णूर येथील औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग बंद पडलेले असल्याने या बंद कारखान्यात  घुंगराळा येथील एक कार्यकर्ता व कुष्णूर येथील काहीजन मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालवायचे. याबाबत कुंटूर पोलिसांना माहिती मिळत होती पण जुगारी पोलीसांच्या हाती लागत नव्हते. ज्या ठिकाणी जुगार चालत असे त्या ठिकाणापासून ठराविक अंतरावर माणसे ठेवून कोण येत कोण जाते यावर बारीक नजर ठेवल्या जात होती. अनोळखी किंवा पोलीस येत असल्याचे दिसताच सावध केले जात होते त्यामुळे जुगाऱ्यांना पकडण्यात यश आले नव्हते पण कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांनी जुगाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पकडण्यासाठी सापळा लावला होता. 

हेही वाचा स्वारातीम विद्यापीठात साकारतोय अत्याधुनिक मीडिया स्टुडिओ -

नगदी दहा हजाराचा ऐवज जप्त

काल ता. २८ रोजी महालक्ष्मीची सुट्टी असल्याने पोलीस विभाग बेसावध असेल या उद्देशाने कुष्णूर औद्योगिक वसाहतीतील सत्य गणपती मंदिर परिसरात जुगार खेळण्यास बसले होते. हि माहिती कुंटूर पोलिसांना समजताच सहायक पोलीस निरीक्षक पठाण यांनी सापळा लावून जुगार अड्ड्यावर धाड मारली. यात नगदी दहा हजाराचा ऐवज जप्त केला.

हे आहेत जुगारी 

कुष्णूर येथील सहा प्रतिष्ठितांना पकडण्यात आले. पोलीस उप निरिक्षक दिनेश येवले यांच्या फिर्यादीवरुन किशोर सुभाषचंद्र शर्मा, एकनाथ दिगांबर जाधव, शेख महम्मद अली हुजूर शहा, मनोहर बालाजी जाधव, लक्ष्मण भागवत शेळगावे व संभाजी माधवराव जाधव यांच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मागच्या अनेक दिवसांपासून लपूनछपून सुरु असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gamblers in Kushnur's five-star industrial estate, Kuntur police arrest six gamblers nanded news