घोरपड विकणारी टोळी नांदेड वन विभागाच्या जाळ्यात

प्रल्हाद कांबळे
Monday, 27 July 2020

वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांच्या पथकाने रंगेहात पकडून चार जणांना अटक केली. ही कारवाई रविवारी (ता. २६) जुलैच्या रात्री नऊच्या सुमारास अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे केली.

नांदेड : नांदेड वनपरिक्षेत्रांतर्गत वन्य प्राणी घोरपडीची विक्री करणाऱ्या टोळीला वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांच्या पथकाने रंगेहात पकडून चार जणांना अटक केली. ही कारवाई रविवारी (ता. २६) जुलैच्या रात्री नऊच्या सुमारास अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे केली. वनविभागाच्या कारवायामुळे वन्य प्राणी तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहाय्यक वनसंरक्षक डी. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, वनपाल पी. एल. धोंडगे, वनरक्षक श्री घुगे, शेख वसीम, श्री शिंदे, श्री काकडे, श्री गव्हाणे आणि वाहनचालक श्री जाधव हे हे गस्त घालत होते. जिल्ह्यात वन्य प्राण्याची तस्करी व हत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याची गुप्त माहिती या पथकाला मिळाली होती. त्यावरुन त्यांनी नागपंचमीच्या दिवशी अर्धापूर तालुक्यात गस्त घालण्यास सुरुवात केली. 

घोरपड हे विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले

वन्य प्राण्यांची हत्या करणे, त्याला आपल्या ताब्यात ठेवणे, हत्या केल्यानंतर त्याचे मांस भक्षण करण्यांवर कारवाई करण्यासाठी हे पथक अर्धापूर तालुक्यात पंचमीच्या दिवशी गस्त घालत होते. पथकातील श्रीधर कवळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी रविवारी (ता. २६) रात्री नऊच्या सुमारास मालेगाव (ता. अर्धापूर) येथे सापळा लावला. यावेळी वन्य प्राणी असलेली घोरपड हे विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले. त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांच्याकडून एक घोरपड जप्त केली. तसेच त्यांच्याकडून एक दुचाकीसुध्दा वनविभागाच्या पथकाने जप्त केली.

हेही वाचा -  Good news : आता कोरोना चाचणी लवकर होणार, मिळाल्या पाच हजार अॅन्टीजेन रॅपिडटेस्ट कीट

हे आहेत आरोपी

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्ञानेश्वर प्रकाश डुकरे (वय १८), शंकर मुकुंदराव कांबळे ( वय २३), मोहन भिकाजी लोखंडे (वय ४५) सर्व राहणार चाभरा(तालुका हदगाव) आणि रमेश सिताराम वाघमारे (वय ३४) राहणार मालेगाव (तालुका अर्धापूर) यांना अटक केली. घोरपड हा वन्य प्राणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची १ मधील असून त्याला अवैधरित्या पकडून ठेवणे, विक्री व खरेदी करणे, शिकार करणे, त्याचे मांस खाणे हा गंभीर गुन्हा आहे. असा गुन्हा करणाऱअया व्यक्तीस तीन वर्षे तुरुंगवास किंवा द्रव्य दंड या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

कारवाई उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली

ही कारवाई उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कोणताही वन्यप्राणी व त्याचे अवयव अवैधरित्या ताब्यात ठेवणे, त्याची शिकार करणे, तस्करी करणे इत्यादी वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ प्रमाणे गुन्हा आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना वनविभागातर्फे आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारच्या कोणत्याही अवैध गोष्टी करु नये तसेच आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागात संपर्क साधावा असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे यांनी केले आहे.

येथे क्लिक करा - कारगिल विजय दिनानिमित्त नांदेड येथे वृक्षारोपण  

मागील आठवड्यात पाटनुर (ता. अर्धापूर) येथील अजगर प्रकरण

अर्धापूर तालुक्यातील पाटनुर येथील काही मंडळीनी जंगली अजगराला ठार करुन त्याला ओढत नेऊन परिसराच्या दूर टाकले. परंतु हा प्रकार त्यांनी   चित्रीकरण करुन सोशल माध्यमावर व्हायरल केला होता. ही बाब वनविभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तेथे जावून शोध काढून सात जणांना अटक   केली होती. त्या सातही जणांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. हे प्रकरण ताजे असतांनाच पुन्हा घोरपड विक्री प्रकरण पुढे आले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The gang that sells indian lizard is in the trap of the forest department nanded news