esakal | नांदेड : नुकसानग्रस्तांना शंभर टक्के विमा भरपाई द्या
sakal

बोलून बातमी शोधा

Crop Insurance

नुकसानग्रस्तांना शंभर टक्के विमा भरपाई द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अतिवृष्टीमुळे पुरस्थिती उद्भवून खरिपातील पिकांचे साठ ते शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. सर्वेचे कामही अंतिम टप्यात आल्यामुळे विमा कंपनीने शेतकर्‍यांना सध्या आगाऊ पंचवीस टक्के रक्कम देण्याऐवजी संपूर्ण शंभर टक्के भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होवून खरिपातील पिकांसह बागायती व फळपिकांचे सहा लाख हेक्टरपेक्षा अधीक पिकांचे नुकसान झाले आहे. याचा फटका साडेआठ लाख शेतकऱ्यांना बसला आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत नुकसानीचे प्रमाण सर्वाधीक आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४१९ कोटी रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यात पिक नुकसानीचे प्रमाण साठ ते शंभर टक्क्यांपर्यंत आहे. यामुळे आता आगाऊ रक्कम घेण्याची वेळ नाही.

नुकसानीबाबत जिल्ह्यातील चार लाख पूर्वसुचना विमा कंपनीकडे दाखल झाल्या आहेत. याबाबत कंपनीकडून सर्वेचे काम अंतिम टप्यात आल्यामुळे जिल्ह्यातील विमाधारक शेतकर्‍यांना यापूर्वी अधिसुचनेव्दारे मागणी केलेली पंचवीस टक्के आगाऊ रक्कम आता न देता कंपनीने शंभर टक्के भरपाई द्यावी, अशी भुमिका जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी घेवून तसे निर्देश विमा कंपनीला दिले आहेत. यामुळे आगामी काळात सर्वेचे काम पूर्ण होताच विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शंभर टक्के विमा भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

"अतिवृष्टीमुळे खरिपात शेतकऱ्यांचे साठ ते शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. पूर्वसुचनांचे सर्वेही कंपनीकडून अंतिम टप्यात आले आहेत. यामुळे पंचवीस टक्के आगाऊ भरपाई ऐवजी पीक विमा कंपनीने नुकसानग्रस्तांना शंभर टक्के भरपाई द्यावी, अशी भुमिका प्रशासनाची आहे. यामुळे शेतकर्‍यांनी काळजी करु नये."

- डॉ. विपिन, जिल्हाधिकारी, नांदेड.

loading image
go to top