पुढाऱ्यांचे देव पाण्यात

हफिज घडीवाला
Saturday, 16 January 2021


सोमवारी (ता.१८) निकाल असल्याने लक्षवेधी ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून तालुक्यातील पुढाऱ्यांनी आपले देव पाण्यात टाकले आहेत. 
 

कंधार, जि. नांदेड ः ८२ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची अंतिम टक्केवारी शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आली. एक लाख ३८ हजार १८२ मतदारांपैकी एक लाख बारा हजार ६०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८१.४९ आली. सोमवारी (ता.१८) निकाल असल्याने लक्षवेधी ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून तालुक्यातील पुढाऱ्यांनी आपले देव पाण्यात टाकले आहेत. 

अप्रत्यक्ष सहभाग 
यंदा तालुक्यातील जवळपास सर्वच पुढाऱ्यांच्या गावात निवडणुका लागल्या होत्या. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (चिखली), आमदार श्यामसुंदर शिंदे (हळदा), माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे (बचोटी), ॲड. मुक्तेश्वर धोंडगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे (बहाद्दरपुरा), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे (शिराढोन), राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले (पानभोसी), राष्ट्रवादीचे रामचंद्र येईलवाड (संगुचिवाडी), जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबुराव गिरे (गउळ), माजी उपसभापती संभाजी पाटील केंद्रे (शेकापूर) यांचा यात समावेश होता. या निवडणुकीत पुढाऱ्यांचा प्रत्यक्ष नसला, तरी अप्रत्यक्ष सहभाग होता. 

हेही वाचा -  नांदेडात कोरोना प्रतिबंधात्मक लसिकरणाला सुरुवात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या आॅनलाईन शुभेच्छा

समर्थकाकडून मात्र विजयाचे दावे 
गावाची निवडणूक असल्याने नाही म्हटले तरी त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. पुढाऱ्यांना त्यांच्याच गावात आव्हान देण्यात आल्याने त्या त्या गावात अटीतटीच्या निवडणूका झाल्याचे समजते. यामुळे पुढाऱ्यांनी धसका घेतल्याचे बोलले जात आहे. ८१ टक्क्याच्यावर मतदान झाल्याने निकालाला घेऊन अंदाज बांधणे अवघड झाले असून कोणता पुढारी किती पाण्यात आहे, हे सोमवारी कळणार असले तरी, पुढारी समर्थकाकडून मात्र विजयाचे दावे केले जात आहेत.

हेही वाचा -  परभणी : कोव्हिशिल्ड लसीचे जिल्ह्यात 400 जणांना डोस; भूलतज्ञ डॉ. दुर्गादास पांडे पहिले मानकरी

निवडणूक कारणावरून दोन गटात हाणामारी 
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळीत निवडणुकीच्या कारणावरून जानापुरी येथे दोन गटात शनिवारी सकाळी झालेल्या तुंबळ हाणामारीत जवळपास सहा जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी जानापुरी ग्रामपंचायतची निवडणूक घेण्यात आली. या वेळी गावामध्ये दोन गटांमध्ये दिवसभर कुरबुर सुरू होती. त्याचे पडसाद शनिवारी सकाळी उमटले. दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून दगडाने, काठीने एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. यात जवळपास पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही गटातील नागरिकांना शांततेचे आवाहन करून गावातील प्रमुख पुढाऱ्यांनी सोबत बैठक घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा - 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The god of leaders is in the water election news