esakal | Video : नांदेडची गोदामाता ‘का’ गुदमरली, वाचा कारण

बोलून बातमी शोधा

Nanded News

नाले, मैला गोदावरीत मिसळत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा निष्कर्ष आहे. यामुळे पाणी प्रदूषित आणि पिण्यास अपायकारक आहे, हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही.

Video : नांदेडची गोदामाता ‘का’ गुदमरली, वाचा कारण
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : एखाद्या लोकसंस्कृतीचा वारसा ही शहराच्या मध्यभागातून वाहणारी नदीदेखील असू शकते. नेमके हेच भाग्य नांदेडला गोदावरीच्या रूपाने लाभले आहे. मात्र, तिचे पावित्र्यच धोक्यात आले आहे. नांदेड शहरातील अनेक नाले, मैला नदीत मिसळत असल्याने गोदामाता गुदमरते आहे.

नदीचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून सूचक तपासण्या केल्या जातात. गोदावरी नदी कुठल्या घटकांमुळे प्रदूषित होत आहे. यासंबंधी धोक्याची घंटा महामंडळाकडून वेळोवेळी दिली जात असते. गोदावरी नदीपात्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी दरमहा नमुने तपासणीसाठी घेतले जातात. सद्यःस्थितीत काळेश्वर, डंकिन, नगिनाघाट, जूना पूल, अमदुरा बंधारा, येळी आदी ठिकाणी आलटून-पालटून पाण्याचे नमुने घेतले जातात. त्यात प्राणवायू (आॅक्सिजन), रसायने (केमिकल) यासह विविघ घातक घटकांचे प्रमाण तपासले जाते. 

हेही वाचा - ‘त्या’ महिलेमुळे सेलू व परभणीतील ६१ जण कॉरन्टाईन

गोदावरी नदीच्या देगलूर नाका परिसरातील जुन्या पुलाजवळील गोदावरी नदीच्या पात्रात ‘बायोलाॅजिकल आॅक्सिजन डिमांड’ म्हणजे जलचर प्राण्यांना आवश्यक त्या प्रमाणात प्राणवायू मिळतो आहे की नाही?  याची तपासणी करणे, त्याचे मानक ३० मिलिग्रॅम पर लिटर आहे का? आदींची तपासणी करण्याची गरज आहे.  फेब्रुवारी २०१५ मध्ये अशी तपासणी केली होती. त्यावेळी तेथे ‘बायोलाॅजिकल आॅक्सिजन डिमांड’चे प्रमाण ३२ मिलिग्रॅम पर लिटर आढळले होते. तरीही गोदावरीच्या पात्राकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी जलचर प्राण्यांना धोका संभवत असून महापालिकेला ही धोक्याची घंटा आहे. नाले, मैला गोदावरीत मिसळत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा निष्कर्ष आहे. यामुळे पाणी प्रदूषित आणि पिण्यास अपायकारक आहे, हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही.

पाण्याला हिरवा रंग कसा
गोदावरीचे पाणी सद्यस्थितीत हिरवे दिसत आहे. मात्र, नांदेड महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना विविध उपाययोजनांबाबत अद्यापही अनभिज्ञच आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी विशेष सूचना दिलेल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यात पाण्याचा रंग हिरवा का? याचा शोधही अद्याप यंत्रणेला तज्ज्ञांच्या मदतीने घेता आले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

हे देखील वाचाच - नांदेडमध्ये टेन्शन : पंजाबला पळालेले 9 भाविक कोरोनाग्रस्त, दोन राज्यांत गुन्हा दाखल
 
पावित्र्याचे होतेय हरण
गोदावरी नदी प्रदूषित झाल्याविषयी वारंवार सरकार, प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे. त्यात आमदुरा (ता.मुदखेड) येथील बंधाऱ्यातील जलसाठ्यात घातक रसायने मिसळल्याने ते नागरिकांसह जनावरांना पिण्यायोग्य नाही. यासंदर्भात महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पाटबंधारे विभाग जबाबदारीत चालढकल करीत आहेत. नांदेड शहरातील १७ नाल्यांचे पाणी गोदावरी नदीत मिसळते. सांडपाणीही सोडले जाते. या स्थितीमुळे गोदावरी प्रदूषित झाली असून तिचे पावित्र्य हरण झाल्याचे खेदाने नमूद करावे लागते.