नांदेड जिल्ह्यात गुडमॉर्निंग पथक कोमात, काय आहे कारण? वाचाच

प्रमोद चौधरी
Sunday, 30 August 2020

उघड्यावर शौचास जाण्याची मानसिकता बदलविण्यासाठी, नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे म्हणून ‘स्वच्छ भारत अभियान’ देशभर राबविले जात आहे.

नांदेड :  नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत गुड मॉर्निंग पथक तयार करण्यात आले होते. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे व लोक सहभागाचा अभाव असल्याने 'गुड मॉर्निंग पथक' कोमात गेल्याचे चित्र आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु गावात आलेल्या पथकास स्थानिक लोकांचा विरोध होत असल्याने व बऱ्याच ठिकाणी स्थानिक प्रशासनाचे सहकार्य नसल्याने, गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ लागला. प्रशासनाच्या वतीने ही मोहीम गुंडाळण्यात आल्याचे सध्यातरी ग्रामीण भागासह शहरातील स्लम भागातील परिस्थितीवरून दिसून येत आहे. 

हेही वाचा - नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून प्लाझ्मा थेरपी उपचार सुरु

गुड मॉर्निंग पथकावर प्रश्‍नचिन्ह
गावागावांत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निर्माण करण्यात आली. परंतु त्या शौचालयाचा वापर न करता गावकरी आजही उघड्यावर शौचास बसत आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी गावपातळीवर प्रशासनाने गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती केली होती. गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून तालुक्‍यातील गावे हगणदारीमुक्त होतील असे वाटले होते. परंतु गावकऱ्यांनी सदर पथकास जोरदार विरोध केल्याने व प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गुड मॉर्निंग पथकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 

हे देखील वाचाच - नांदेड : प्लाझ्मा दानाची प्रसार यंत्रणा मंदावली, जिल्ह्यात फक्त एवढे प्लाझ्मा दान

नागरिकांचा सहभागच नाही
पहाटे पाच ते आठ या दरम्यान गुड मॉर्निंग पथकातील अधिकारी, कर्मचारी व गावकरी गावाच्या वेशीवर जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत होते. प्रसंगी गांधीगिरी सुद्धा करण्यात येत होती. गावागावात स्वच्छता टिकावी नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे हा यामागचा उद्देश होता. परंतु प्रशासनाचे उदासीन धोरण व योग्य नियोजनाअभावी नागरिकांचा विशेष सहभाग नसल्यामुळे आणि स्थानिक प्रशासनाची साथ नसल्यामुळे गुड मॉर्निंग पथक मोहीम संपुष्टात आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

येथे क्लिक कराच - Video- उद्धवा, आता तरी उघड मंदिराचे दार; नांदेडमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन

शासनाच्या निर्धाराला सुरुंग
उघड्यावर शौचास जाण्याची नागरिकांची मानसिकता बदलावी, सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही हे अभियान राबविले जात आहे. त्यासाठी खेडोपाडी, वाडी-तांड्यांवरही शौच्यालये बांधण्यात आली. परंतु, नागरिक त्याचा वापर करताना दिसून येत नसल्याने शासनाच्या निर्धारालाच सुरुंग लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good Morning Squad Stop In Nanded District