esakal | Good News:नांदेड जिल्ह्याला 66 नविन रुग्णवाहिका; कोरोनामध्ये प्रशासनाला आधार

बोलून बातमी शोधा

ambulance
Good News:नांदेड जिल्ह्याला 66 नविन रुग्णवाहिका; कोरोनामध्ये प्रशासनाला आधार
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन त्यावर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ग्रामिण भाागातून रुग्णांची ने आण करण्यासाठी आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिका नव्हत्या. त्यामुळे रुग्णांची व जिल्हा आरोग्य विभागाची कसरत होत होती. यावर केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून जिल्ह्याला ५२ नव्या रुग्णवाहिका मिळाल्या असून त्यातील १७ रुग्णवाहिका गुरुवारी (ता. २९) शहरात दाखल झाले्या आहेत. तर उर्वरित ३५ रुग्णवाहिका शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळपर्यंत येणार आहेत. याशिवाय स्थानिक विकास निधीतून चार आमदारांनी चौदा रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केल्यामुळे नांदेड जिल्ह्याला नव्या 66 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यातील सहा रुग्णवाहिका महानगरपालिका तसेच आयुर्वेद महाविद्यालयासाठी दिल्या जाणार आहेत.

नांदेड जिल्हा राज्यात विस्ताराने मोठा आहे. सोळा तालुक्यांच्या ग्रामीण भागात ६८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका व अन्य वाहने जुनी झाली होती. दहा वर्षापूर्वी खरेदी केलेल्या रुग्णवाहिका भंगारात जात असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापन निधीतून नव्या रुग्णवाहिकेची मागणी केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाच्या खर्चाला सर्वोच्च प्राधान्य असल्याने जिल्ह्याला मागितल्या तितक्या रुग्णवाहिका केंद्र सरकारच्या निधीतून उपलब्ध झाल्या आहेत.

हेही वाचा - भोकर तालुक्यात बालविवाह रोखला; जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व भोकर प्रशासनाची तत्परता

जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले की, या निधीतून प्राप्त होणाऱ्या ५२ पैकी १७ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. एका रुग्णवाहिकेची किंमत साधारण आता साडेदहा लाख रुपये इतकी असून रुग्णवाहिकेत रुग्णास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी स्ट्रेचर तसेच अन्य साधनांची उपलब्धता आहे. आवश्यकतेनुसार ऑक्सीजन सिलेंडर लावून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेता येते. शासनाकडून येणाऱ्या ५२ पैकी ४० रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य विभागाला मिळणार आहेत.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या भोकर मतदार संघाच्या विकास निधीतून दोन, देगलूरचे आमदार कै. रावसाहेब अंतापूरकर यांनी पाच, हदगाव- हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी चार आणि किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी तीन रुग्णवाहिका आपल्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्वच्या सर्व १४ रुग्णवाहिका ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिकांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यास बरीच मदत होईल. रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य ठिकाणी हलविण्यासाठी या रुग्णवाहिका उपयोगी पडतील असा दावा डॉ. शिंदे यांनी केला आहे.