Good News : अशोक चव्हाणांनी नांदेडला आणले आणखी एक महत्त्वाचे कार्यालय

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 26 January 2021

दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त कार्यालय नांदेडला नेले होते. त्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले होते.

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने महावितरणचे मंडळ कार्यालय नांदेडला होणार आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी (ता. 26) जानेवारी दुपारी चव्हाण यांच्या हस्ते स्नेहनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग व कार्यालय परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त कार्यालय नांदेडला नेले होते. त्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले होते. महावितरणचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता पी. आर. भारती यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे यापुढे राज्यात पाच विद्युत मंडळ कार्यालय असतील. पुणे व नागपूरला हे कार्यालय पूर्वीपासून कार्यरत होते. आता मुंबई, औरंगाबाद व नांदेड येथे ही कार्यालय नव्याने सुरु होतील. विद्युत मंडळ कार्यालयात अधीक्षक अभियंत्यासह अन्य अभियंते व कर्मचारी असतील. याशिवाय विद्युत शाखेचे विभागीय कार्यालय नांदेडला राहणार आहे. या कार्यालयात कार्यकारी अभियंत्यासह पंधरा कर्मचारी कार्यरत असतील.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नांदेडला ३२ अधिकारी व कर्मचारी मिळणार असून ही दोन्ही कार्यालय नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आले. त्यामुळे विद्युत परवानग्या आदी सर्व कामे नांदेडला शक्य होणार असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे औरंगाबाद शहराला मोठी भेट मिळाली आहे. औरंगाबादचे राज्याच्या नकाशातील मध्यवर्ती स्थान पाहता या ठिकाणी दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे राज्याचे मुख्यालय सुरु होणार आहे. या मुख्यालयात अधीक्षक अभियंता दर्जाचे प्रमुख कार्यरत असतील.

या मंडळाकडे प्रामुख्याने तांत्रिक लेख यांची तपासणी, भांडार साठा तपासणी, आकस्मिक कार्यस्थळ तपासणी, विद्युत विषयक कामाच्या तक्रारी, विशेष चौकशी व तपासणी आदी जबाबदारी असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या ता. 29 ऑक्टोबर 2020 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेचे बळकटीकरण करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे. मागील काळामध्ये ही शाखा गुंडाळण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या शाखेची उपयुक्तता व त्यांच्याकडील कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन या शाखेचे बळकटीकरण केले आहे. त्यामुळे त्याचा भविष्यातील विकासकामांसाठी फायदा होणार असल्याची माहिती भारतीय यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News: Ashok Chavan brings another important office to Nanded