Good News:दक्षिण मध्य रेल्वेची महाराष्ट्रातील पहिली किसान रेल्वे नगरसोल येथून गुवाहाटीला रवाना 

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 5 January 2021

किसान रेल्वेने मालवाहतूक करण्याकरीता मालवाहतूक दरामध्ये 50 टक्के सूट

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेने नेहेमीच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ प्राप्त व्हावी या करिता सतत करत असलेल्या प्रयत्नात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.  या संदर्भात मंगळवार (ता. पाच) रोजी दक्षिण मध्य रेल्वेने महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरु केली. कांद्याने भरलेला प्रारंभिक रॅक नांदेड विभागातील नगरसोल ते गुवाहाटीपर्यंत सुरु झाला. नांदेड विभागातील ही पहिली किसान रेल आहे. 

कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करुन देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरु केली आहे. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने "ऑपरेशन ग्रीन्स–टॉप टू टोटल" च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली.  त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातील प्रथम किसान रेल्वेलाही कांद्याच्या वाहतुकीसाठी 50 टक्के दर सवलत देण्यात आली आहे. 

हेही वाचाकृष्णूर धान्य घोटाळ्यातील आरोपी वेणीकरांच्या अडचणीत वाढ, बिलोली न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला -

यापूर्वी, माल गाड्यांमधून नगरसोल स्थानकातून कांद्याची लोडिंग अधूनमधून होत असे.  तथापी, या कांद्यांची मालगाड्यांमधून वाहतूक करण्याकरिता शेतकरी, व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात माल खरेदी करावा लागत असे. जेणेकरुन संपूर्ण रेल्वे भार क्षमता  (पूर्ण ट्रेन लोड क्षमता) पूर्ण होऊ शकेल. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर माल गोळा करण्याकरीता खूप जास्त मालवाहतुकीच्या साधनांची आवश्यकता लागत असे. मालवाहतूक करणाऱ्या ग्राहकांसाठी हे एक कठीण काम होते.

यावर मात करण्यासाठी नांदेड विभागाच्या मालवाहतूक टीमने शेतकरी, व्यापारी समुदायाशी नियमित बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांना त्यांच्या मालाची वाहतून किसान रेल्वेने मालगाडीच्या तुलनेत अधिक सुलभतेने, कमी खर्चात, त्रास- मुक्त आणि जलद वाहतूक कशी करता येईल या विषयी माहिती देण्यात आली. तसेच किसान रेल्वेच्या इतर सुलभ फायद्यांविषयी जागरुक केले. 

येथे क्लिक करा - सरत्या वर्षात परभणी पोलिसांची चमकदार कामगिरी ; अनेक गुन्हे 100 टक्के उघडकीस, प्रतिबंधात्मक कारवाई देखील यशस्वी

नांदेड माल वाहतूक टीमच्या या सर्व सातत्याने केलेल्या विपणन प्रयत्नांमुळे किसान रेल्वे सुरु झाली आहे. शेतकरी तसेच व्यापारी या सुविधामार्फत जास्तीत जास्त गाड्यांचा भार घेण्यास, वापर करण्यास इच्छुक असल्याचे दर्शवित आहेत. नांदेड विभागातील पहिली किसान रेल्वे मंगळवार (ता. पाच) नगरसोल स्थानकाहून फलाट एकवरुन सायंकाळी साडेपाच वाजता निघाली. या किसान रेल्वेमध्ये प्रत्येकी २३ टन क्षमतेच्या २२ पार्सल व्हॅन आहेत. ही गाडी ५० तासांच्या अल्प कालावधीत अडीच हजार किलोमिटर अंतर पार करून सुमारे ५२२ टन कांद्याचा माल घेवून ता. सात जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता गुवाहाटी गुड्स कॉम्प्लेक्सवर आसाममध्ये पोहोचेल.  

दक्षिण मध्य रेल्वे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातुन यशस्वीपणे किसान रेल सुरु करण्याकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला. श्री माल्या यांनी शेतकरी आणि व्यापारी यांना आवाहन केले आहे की, किसान विशेष रेल्वे करिता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरुन आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. तसेच दक्षिण मध्य रेल्वेची मालवाहतूक वाढवण्यात हातभार लावावा.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News: South Central Railway's first Kisan Railway in Maharashtra leaves Nagarsol for Guwahati nanded news