नांदेड जिल्ह्यात पुन्हा धान्य घोटाळा- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

file photo
file photo

नांदेड : कृष्णूर (ता. नायगाव) येथील कोट्यावधीचा धान्य घोटाळा राज्यभर गाजला. त्यातील अटक झालेल्या आरोपींना नुकताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने जामीन दिला. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असतानाच पुन्हा एकदा नवा धान्य घोटाळा उघडकीस आला आहे.मुक्रमाबाद (ता. मुखेड) परिसरातून काळ्या बाजारात जाणारा शासकिय वितरणाचा गहू व तांदूळ पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्रमाबाद ते उदगीर रस्त्यावर रावणकोळा चौक येथे सोमवारी (ता. ३१) दुपारी चारच्या सुमारास केली.

जिल्ह्यात लाखो रुपयांचा शासकीय वितरणाचा गहू आणि तांदूळ या धान्याचा अपहार करुन चढ्या दराने विक्री करण्यासाठी दुकानदार शासकिय यंत्रणेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरुन हे कारनामे करतात. स्वस्त धान्य दुकानदार आपल्या ग्राहकांना फसवत त्यांच्या नवे आलेले शासकिय धान्य संपले किवा आलेच नाही असा दावा करुन ते धान्य काळ्या बाजारात नेतात. गोरगरीब शिधापत्रिकाधारकांना देणे बंधनकारक असताना त्यांची दिशाभूल करुन त्यांना हे धान्य दिल्या जात नाही. एवढेच नाही तर काही ठिकाणी तर थेट गोदामपालच यात गुंतलेले आहेत.

मुक्रमाबाद येथील शासकिय धान्याचे गोदामपालाचा गोरखधंदा

मुक्रमाबाद येथील शासकिय धान्याचे गोदामपाल श्री. मुधोळकर यांनी धान्य पुरवठा ठेकेदार बालाजी हणमंत अप्पा बोधणे याला हाताशी धरुन धान्याचा काळाबाजार करत होता. गोदामातून स्वस्त धान्य दुकानावर माल पाठवायचा म्हणून ते धान्य देत असत. मात्र हे धान्य स्वस्त धान्य दुकानावर न जाता थेट काळ्या बाजारात जात असे. हा गोरखधंदा पोलिसांच्या कारवाईमुळे उघड झाला आहे. पोलिसांनी दोन टेम्पोसह साडेआठ लाखाचे धान्य जप्त करुन दोघांना अटक केली. 

सव्वा दोन लाखाचे धान्य जप्त

गहू आणि तांदूळ गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी पाठवीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. त्यांनी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याशी चर्चा करुन आपले पथक मुक्रमाबाद परिसरात गस्तीवर पाठविले. यावेळी सव्वा दोन लाखाचे धान्य दोन टेम्पो भरुन काळ्या बाजारात जाताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पकडण्यात यश आले. 

गोदामपाल श्री. मुधाळोकर व ठेकेदार श्री. बोधणे फरार

फौजदार आशिष बोराटे हे आपल्या सहकाऱ्यांसह मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात ता.31 ऑगस्ट रोजी गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेली माहितीनुसार त्यांनी केलेली कारवाई उल्लेखनीय आहे. मुक्रमाबाद ते उदगीर जाणाऱ्या रावणकोळा रस्त्यावर टेम्पो (एमएच२६-एडी- ८१६ आणि एमए०४-सीपी १५५९) हे शासकीय गोदाम मुक्रमाबाद येथून स्वस्त धान्य दुकानात वितरण करण्याचा बहाणा करून एक लाख २० हजाराचा ६० क्विंटल गहू आणि एक लाखाचा ५० क्विंटल तांदूळ टेम्पोसह आठ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी ठेकेदार बालाजी हनुमंतआप्पा बोधने आणि गोदामपाल श्री. मुधोळकर हे पोलिसांच्या तावडीत सापडले नाही. मात्र टेम्पो चालक अमोल काशिनाथ घाणेकर आणि सय्यद नियमतअली सय्यद अकबर या दोघांना अटक केली.

फौजदार आशिष बोराटे यांचे केले वरिष्ठांनी कौतुक

फौजदार आशिष बोराटे यांनी आपले सहकारी पोलिस हवालदार दशरथ जांभळीकर, बालाजी तेलंग आणि श्री. केंद्रे यांच्या मदतीने दोन्ही टेम्पो मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात लावून दोन्ही चालकांना मुक्रमाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. फौजदार आशिष बोराटे यांच्या फिर्यादीवरुन जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के. एन. गड्डीमे करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com