ग्रामपंचायत निवडणुक - नांदेडला प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्यात, शुक्रवारी मतदान

file photo
file photo

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान होत आहे. त्यासाठीचा प्रचार अंतिम टप्यात आला असून प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे त्या त्या गावातील पॅनल प्रमुखांनी मंगळवारी (ता. १२) गावातून प्रचारफेरी काढण्यावर भर दिला. 

नांदेड जिल्ह्यात एक हजार १३ ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झाली. त्यापैकी १०६ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. आता उर्वरित ९०७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी (ता. १५) मतदान होत आहे. जिल्ह्यातील १३ लाख २१ हजार २२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. दुसरीकडे पॅनलप्रमुखांनी देखील आपआपल्या उमेदवारांना सोबत घेऊन प्रचाराचे नियोजन केले आहे. 

विविध पक्षांचे पदाधिकारी प्रचारात
यंदा कोरोना संसर्गामुळे उमेदवारासह पाच व्यक्तींनाच प्रचाराची परवानगी असल्यामुळे पॅनेलप्रमुखांसह उमेदवारांनाही प्रचारासाठी मर्यादा येत आहेत. काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत असले तरी त्यातून मार्ग काढत नियोजन करत प्रचार सुरू आहे. गावातून प्रचारफेरी काढण्यावर पॅनेलप्रमुख आणि उमेदवारांचा भर आहे. त्या त्या तालुक्यातील आजी माजी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी हे देखील निवडणुकांवर लक्ष ठेऊन असून काही ठिकाणी भेटी देऊन प्रचारसभा तसेच प्रचारफेरी सहभागी होत आहेत. 

कोरोना नियमावलीचे पालन बंधनकारक 
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. मतदानासाठी आलेल्या मतदारांना मास्क बंधनकारक आहे. ओळख पटण्यासाठी काही वेळेपुरते मास्क काढावे लागणार आहे. तसेच मतदानादरम्यान कोरोनाचा धोका होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच मतदारांचे तापमानही मोजले जाणार आहे. 

मतदानाची तयारी पूर्ण - डॉ. विपीन इटनकर
जिल्हा प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मतदान केंद्राची स्थापना करण्यासोबतच मतदान यंत्र सील करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षा व्यवस्थेसह कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड. 

चोख पोलिस बंदोबस्त - प्रमोद शेवाळे
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनासह पोलिस विभागाने तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बंदोबस्तामध्ये जवळपास तीन हजार शंभर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यात ९९ मतदान केंद्र संवेदनशील असून त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 
- प्रमोद शेवाळे, पोलिस अधीक्षक, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com