
एकीकडे कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने धोका वाढल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे जिल्हा, आरोग्य, महापालिका आणि पोलिस प्रशासन आणि अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभावही वाढत चालला आहे. त्यातच लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे अडचणीत वाढ होत असल्याचे चित्र आहे.
नांदेड - एकीकडे कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने धोका वाढल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे जिल्हा, आरोग्य, महापालिका आणि पोलिस प्रशासन आणि अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभावही वाढत चालला आहे. त्यातच लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे अडचणीत वाढ होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी कोरोना पॉझिटिव्हचे पाच रुग्ण सापडत नसल्यामुळे नांदेडकरांचीही भीती आणि काळजी वाढत चालली असून प्रशासनात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.
जगभरातील विविध देशात कोरोनाने शिरकाव केला असून अजूनही मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. त्यात भारताचाही समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण असून नांदेडमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. लॉकडाउनच्या पहिल्या टप्यात नांदेड शहर आणि जिल्हा कोरोनामुक्त होता मात्र दुसऱ्या टप्प्यात तब्बल ३१ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - Nanded Breaking : ‘ती’ महिला सकाळी पाॅझीटीव्ह, दुपारी मृत्यू
समन्वय कमी होत चालला
पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य आणि महापालिका यांच्यात समन्वय होता तो दुसऱ्या टप्प्यात कमी होत चालल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांना देखील माहिती मिळण्यास उशीर होऊ लागला. अनेक अधिकारी आणि विभागप्रमुख मोबाईलवर देखील माहिती देण्यास टाळाटाळ करु लागले. त्यामुळे जनतेपर्यंत माहिती देण्यासाठी अडचणी येत आहेत. पूर्वीसारखाच संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आणि समन्वय ठेऊन काम सुरु झाले तर त्याचा निच्शितच नागरिकांना फायदा होणार आहे.
लोकप्रतिनिधींचेही हवे लक्ष
पहिल्या टप्यात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे तसेच इतर लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन नियोजन केले. बैठका घेतल्या त्याचबरोबर अन्नधान्याचे वाटप केले. दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर आदींनी पुढाकार घेतला तर तिसरीकडे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जिल्हाभरात गरजूंना अन्नधान्याचे किट वाटप केले. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर लोकप्रतिनिधींचे लक्ष कमी होताना दिसून येत आहे. आता या गंभीर होत जाणाऱ्या परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी अधिक लक्ष देण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडकरांनो आता घ्यावी लागणार काळजी...
कोरोनाग्रस्त रुग्णांवर हवी करडी नजर
आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे महापालिका आणि पोलिस प्रशासनासह संबंधित विभागांना समन्वय ठेऊन पालन करावे लागणार आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची नावे, पत्ता, वय, मोबाईल क्रमांक सगळी माहिती अपटेड ठेवण्याचे काम महापालिकेचे असताना त्याकडे पालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अशा चुका भविष्यात अडचणीच्या ठरु शकतात. रुग्णांचे अपूर्ण पत्ते लिहिल्यामुळे पोलिसांचा गोंधळ उडाला होता. अशा वेळी गाफिल राहिलेल्या संबंधित महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आयुक्तांनी कान टोचणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे कॉलसुद्धा अनेक अधिकारी, कर्मचारी घेत नाहीत की उत्तर देत नाहीत. त्यामुळे घटना नेमकी काय घडली? याचा उलगडा होत नाही. त्यामुळे या कामातील अडचणी दूर करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्यामुळे आता कंटेनमेंट झोनचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये, यासाठी प्रशासनाला आणखी करडी नजर ठेऊन आणि एकमेकांत समन्वय ठेऊन काम करावे लागणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही, यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत.