हाथरस प्रकरण : नांदेडात पडसाद, युपी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

प्रल्हाद कांबळे
Thursday, 1 October 2020

आझाद समाज पार्टी व भीम आर्मीच्या वतीने कॅन्डल मार्च, काही संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आरोपींना कठोर शिक्षेची केली मागणी.

नांदेड : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार व खून प्रकरणाच्या घटनेचे नांदेडातही बुधवारी (ता. ३०) पडसाद उमटले. आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्यावतीने सायंकाळी आयटीआय चौकात महात्मा फुले पुतळ्यासमोर कॅन्डल मार्च काढून उत्तर प्रदेश सरकारचा पुतळा जाळण्यात आला. तर अन्य संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील एका तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. एवढे करून हे नराधम थांबले नाहीत तर त्यांनी त्या पीडितेची जीभ कापून तिला जबरदस्त मारहाण केली. त्यात तिच्या पाठीचे हाड मोडले होते. या क्रूर अत्याचारानंतर ती निर्भया सुमारे दोन आठवडे मृत्यूशी झुंज देत होती. अखेरीस त्या निर्भयाची झुंज मंगळवारी (ता. २८)संपुष्टात आली. उत्तरप्रदेश पोलिसांनी मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास तिच्या कुटुंबीयांना भाग पाडले.

हेही वाचा - जिल्ह्यात दहा केंद्रावर एम.एच.टी.-सीईटी-2020 प्रवेश परीक्षा होणार- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन

हाथरसप्रकरणी कॅन्डल मार्च 

दिल्लीतील निर्भयाप्रमाणे अतिशय क्रूर अशा या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या देशात अजून किती दिवस तरुणीवर अत्याचार होणार आहे असा सवाल तरुणींकडून केला जात आहे. उत्तर प्रदेशात चंद्रशेखर रावण यांच्या नेतृत्वातील भीम आर्मी आणि आजाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हाथरस प्रकरणी शहरांमध्ये बुधवारी निदर्शने केली. तसेच या प्रकरणी चार नराधमांना तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी केली जात आहे. हाथरस येथील उपरोक्त घटनेचे बुधवारी नांदेडात पडसाद उमटले. आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यासमोर निषेधासाठी कॅन्डल मार्च काढला होता. तसेच या कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेश राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यात पिकविमा कंपनीकडे ४५ हजार अर्ज -

विविध संघटनाचे निवेदन

राहुल प्रधान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात दिनेश लोणे, अशोक वावळे, सम्राट आढाव, बंटी कंधारे, लखन कारले, गायकवाड आदींनी भाग घेतला होता. वरील मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या एका शिष्टमंडळानेही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी प्राध्यापक राजू सोनसळे, ॲड. यशोनील मोगले, अतिश ढगे, सचिन भावे, सचिन कदम, विशाल शेळके, ॲड. भूषण शेळके, कुणाल भुजबळ, राहुल घोडजकर, शुद्धोधन गायकवाड, अभय सोनकांबळे, रवी मस्के, शैलेश वावळे, नागेश दुधमल, नितीन सोनसळे, रितेश गुळवे हे उपस्थित होते. अशाच प्रकारे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, सरचिटणीस गणेश तादलापूरकर, बच्चू यादव, संतोष दगडगावकर, अंकुश शिखरे यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींना शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hathras case: Padsad in Nanded, symbolic statue of UP government burnt nanded news