esakal | पालकाशी अश्लील भाषा बोलणाऱ्या मुख्याध्यापकाचे तडकाफडकी निलंबन | Nanded Crime News
sakal

बोलून बातमी शोधा

suspend

पालकाशी अश्लील भाषा बोलणाऱ्या मुख्याध्यापकाचे तडकाफडकी निलंबन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नायगाव (जि.नांदेड) : शाळेत उशिरा आल्याचा जाब विचारणाऱ्या पालकास अश्लील शिवीगाळ करणारा मुगाव येथील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकाचा व्हिडीओ जिल्हाभर व्हायरल झाला आहे. त्यांची ही वर्तणूक शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी असल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून. नायगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.सात) निलंबनाचे आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे. मुगाव (ता.नायगाव) (Naigaon) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख नजीर पीर अहेमद यांनी शाळेत उशिरा तर आलेच. पण काही शिकवणी करत नसल्याचा जाब एका पालकाने गुरुवारी (ता.सात) विचारला असता शेख नजीर यांनी अश्लील व अशोभनीय भाषा (Nanded) वापरली. एक शिक्षक अशी भाषा वापरत असतानाचा व्हिडीओ (Zilla Parishad School) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दखल घेत तातडीने कारवाई केली आहे. सदरच्या वादग्रस्त मुख्याध्यापकाचे निलंबनाचे आदेश नायगावच्या गटशिक्षणाधिकांनी काढले आहे.

हेही वाचा: पोलिस दाम्पत्यात न्यायालयाच्या परिसरात वाद अन् झटापट

शेख नजीर पीर अहेमद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुगाव केंद्र, गडगाचे (ता.नायगाव) मुख्याध्यापक यांनी शिक्षकी पेशास अशोभनीय असे वर्तन केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक ) १९६७ च्या नियमांचा भंग केला असून सदर कृतीने विभागाची बदनामी झाल्याचे दिसून येते. सदर बाब गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( वर्तवणूक) नियम १९६७ भंग केल्याच्या कारणावरून शेख नजीर अहेमद हे आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नुसार सेवेतून निलंबित करीत आहे, असे आदेशात नमूद केले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती नायगाव राहणार आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुजोर मुख्याध्यापकाने पालकासोबत अशोभनीय व अश्लील भाषा वापरल्याच्या प्रकाराचा मुगाव येथे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: पालकमंत्री देसाईंचा दौरा वाऱ्यावरची वरात, तासाभरात नुकसान पाहणी

जाब विचारणाऱ्या पालकास जबाबदार शिक्षकाने अशी असंस्कृत भाषा वापरणे हे त्यांच्या पेशाला न शोभणारे आहे. शेख नजीर यांच्या बेताल वक्तव्याची गंभीर दखल घेवून त्यांना निलंबित केले असून निलंबनाचे आदेश काढले आहेत.

- लता कौठेकर, गटशिक्षणाधिकारी, नायगाव.

मुख्याध्यापक शेख नजीर हे उशिरा येवून शाळेत बसून होते तर विद्यार्थी मैदानात खेळत होते. त्यामुळे मी त्यांना अगोदरच दीड वर्षांपासून मुल शिक्षणापासून वंचित आहेत आणि आपण रिकामे बसण्याऐवजी विद्यार्थ्यांना वर्गात घेवून काहीतरी शिकवा असे बोललो असता त्यांनी अशा प्रकारे शिविगाळ केली.

- गजानन लघूळे, पालक , मुगाव.

loading image
go to top