ह्रदयद्रावक घटना : दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू

प्रल्हाद कांबळे
Thursday, 15 October 2020

ही ह्रदयद्रावक घटना नांदेड तालुक्यातील वडवणा येथे घडला. दोघापैकी एका भावाचा मृत्यू नांदेड तर दुसऱ्याचा मृत्यू लातूर येथे झाला. दोघा भावंडांनी उभ्या आयुष्यात तिसऱ्या मित्राची गरज पडू दिली नाही.

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यात मृत्यूदरही त्याच गतीने वाढत असल्याने सर्वाधीक धोका जेष्ठ नागरिकांना असल्याचे पुढे आले आहे. त्यात रक्तदाब, मधूमेह, दमा अशा गंभीर आजार असलेल्यांना तर मोठा धोका निर्माण झाला आहे. वडवणा (ता. नांदेड) येथील दोन सख्ख्या भावांचा बुधवारी (ता. १४) एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना नांदेड तालुक्यातील वडवणा येथे घडला. दोघापैकी एका भावाचा मृत्यू नांदेड तर दुसऱ्याचा मृत्यू लातूर येथे झाला. दोघा भावंडांनी उभ्या आयुष्यात तिसऱ्या मित्राची गरज पडू दिली नाही. त्यांचा एकमेकात एवढा जीव होता की शेवटचा श्वासही त्यांनी एकाच दिवशी घेतला. या घटनेमुळए सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वडवाणा पंचक्रोशीत परिचित असलेल्या दोघा भावांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यातील ७८ वर्षीय धाकट्या भावावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तर ७५ वर्षीय मोठ्या भावाला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू असताना कुटुंबीयांचीही मोठी ओढातान झाली. मात्र तरीही दोघे कोरोनावर मात करून सुखरूपणे बाहेर येतील अशी कुटुंबीयांसह ग्रामस्थांना ही अपेक्षा होती. डॉक्टरांनी दोघांनाही वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र उपचारात प्रतिसाद न दिल्याने या दोन्ही भावांचा बुधवारी एकाच दिवशी मृत्यू झाला.

एकाच दिवशी दोघांचा मृत्यू 

बुधवारी सकाळी नांदेड येथे उपचार घेत असलेल्या भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या तासाभरातच लातूर येथे उपचारादरम्यान मोठा भाऊही दगावल्याचे वृत्त आल्याने कुटुंबीय ग्रामस्थांमध्ये एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. नांदेड येथे मृत्युमुखी पडलेल्या भावावर स्मशानभूमीत शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तर लातूर येथे मृत्यू झालेल्या भावावर प्रशासनाच्यावतीने तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदेड येथील अंत्यसंस्कार प्रसंगी मुलगा, मुलीसह काही नातेवाईक उपस्थित होते. मात्र लातूर येथील भावाच्या अंत्यसंस्काराला नातू असलेल्या लातुर येथील डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडला. 

दोन्ही भावानी ३५ वर्ष गावचा कारभार सांभाळला

अंत्यसंस्काराला वडवणा येथील एकालाही जाता आले नाही. विशेष म्हणजे दोघे भाऊ गावाच्या विकासासाठी कायम आग्रही राहिले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले होते. २५ वर्षे नेतृत्व मोठ्या भावाने सरपंच म्हणून गावाची धुरा सांभाळली तर लहान भावाने दहा वर्षे गावाचा सरपंचपदी नेतृत्व केले. या दोघांनाही एकाच दिवशी मृत्यू आल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heartbreaking incident: Two brothers died on the same day nanded news