नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने सात मंडळात अतिवृष्टी 

अभय कुळकजाईकर
Tuesday, 15 September 2020

नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासात बिलोली तालुक्यातील सगरोळी मंडळात ८६ मिलीमीटर, आदमपूर मंडळात ९४.५० तर लोहगाव मंडळात ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यातील चांडोळा मंडळात ९७.७५ मिलीमिटर तर देगूलर तालुक्यात देगलूर मंडळात ७५.७५, खानापूर मंडळात ८३.७५ आणि शहापूर १०६.२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

नांदेड - जिल्ह्यात सोमवारी (ता. १४) सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कापूस, ज्वारी, तसेच फळपिके आडवी झाली आहेत. गेल्या चोवीस तासात मंगळवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २२.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात सात मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात ता. एक जूनपासून आज मंगळवारपर्यंत (ता. १५) पडलेला पाऊस ६५१.४० मिलीमीटर म्हणजेच ८२.५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले असून प्रकल्पही भरत आले आहेत. 

हेही वाचा - सगरोळीत शेकडो एकर जमीन गेली पाण्याखाली 

पावसाची जोरदार हजेरी

सोमवारी सर्वच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक मंडळात पाणीसाठा वाढला आहे. या पावसाचा सोयाबीन तसेच कापूस, ज्वारीला फायदा झाला आहे. मात्र, काही ठिकाणी कापूस, ज्वारी, केळी आदी पिके आडवी झाली आहेत. खरीप हंगामाला थोडेफार नुकसान झाले असले तरी या पावसाचा पुढील रब्बी हंगामाला फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

सात मंडळात अतिवृष्टी

गेल्या २४ तासात जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील सगरोळी मंडळात ८६ मिलीमीटर, आदमपूर मंडळात ९४.५० तर लोहगाव मंडळात ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यातील चांडोळा मंडळात ९७.७५ मिलीमिटर तर देगूलर तालुक्यात देगलूर मंडळात ७५.७५, खानापूर मंडळात ८३.७५ आणि शहापूर १०६.२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

तालुकानिहाय पडलेला पाऊस 
गेल्या २४ तासात मंगळवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे ः नांदेड - २८, बिलोली - ३२.८, मुखेड - ४८, कंधार - ३८.३, लोहा - २६.९, हदगाव - ९.१, भोकर - ६.८, देगलूर - ४७.४, किनवट - २.८, मुदखेड - १८.३, हिमायतनगर - २.९, माहूर - ०.४, धर्माबाद - २३.३, उमरी - ९.६, अर्धापूर - ३१.४, नायगाव - १३.१ मिलीमीटर. एकूण सरासरी - २२.९ मिलीमीटर 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरूपी समायोजन रखडले 
 
विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले
 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यासह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील काही भागांत पाऊस सुरूच आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामुळे गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू आहे, तसेच पडणारा पाऊस लक्षात घेऊन मंगळवारी (ता. १५) तीन दरवाजे उघडण्यात आले. यातून ४४ हजार १७७ क्यूसेक्स पाणी गोदावरीत सोडण्यात येत आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातून देण्यात आली. यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने मराठवाड्यातील जवळपास सर्वच प्रकल्प तुडुंब भरले आहेत. जायकवाडी, सिद्धेश्वर, विष्णुपुरी, इसापूर आणि येलदरी प्रकल्प भरल्याने दरवाजे उघडण्यात येत आहेत. दरम्यान मंगळवारी (ता. १५) विष्णुपुरीच्या प्रकल्प क्षेत्रात झालेला पाऊस तसेच येलदरी व सिध्देश्वर प्रकल्पांतील पाण्याचा येवा विष्णुपुरी प्रकल्पात येत आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन विष्णुपुरी प्रकल्पाचे (क्रमांक नऊ, १३ व १४) तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ४४ हजार १७७ क्यसेक्स पाणी गोदावरीत सोडण्यात येत आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागातर्फे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains lashed seven mandal in Nanded district, Nanded news