Video - नांदेडमध्ये सोमवारी रात्री पावसाची जोरदार बॅटींग, बहुतांश रस्ते झाले होते जलमय

Nanded News
Nanded News

नांदेड : सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाने नांदेड शहर व परिसराला झोडपले. सुमारे तासभर धुवॉंधार पाऊस बरसत होता. यावेळी सोसाट्याचे वारेही सुटले होते. दरम्यान या पावसामुळे सखल भागात सर्वत्र पाणी साचल्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले होते. परिणामी वाहनधारकांना रस्त्यावरून  जाताना मोठी कसरत करावी लागली.

सायंकाळी सातच्या सुमारात नांदेड परिसरात प्रचंड मोठा पाऊस झाला. सुमारे एक तास पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर सखल भागात सर्वत्र पाणी साचले होते. शहरातील श्रीनगर, स्नेहनगर, आनंदनगर, शाहूनगर, दत्तनगर, वसंतनगर तसेच व्हीआयपीरोड, कलामंदिर, महावीर चौक आदी भागात रस्त्यावर सर्वत्र पाणी साचलेले होते. मोर चौक, पावडेवाडी नाका ते शासकीय विश्रामगृह हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता. अनेक ठिकाणी रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. रस्त्यालगतच्या नाल्या काही ठिकाणी उंच झाल्याने पाणी रस्त्यावर आले होते.

सखल भागातील नागरिकांचे या पावसाने प्रचंड हाल केले. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे त्यांना घरात राहणे देखील अवघड झाले होते. नदीकाठच्या परिसरातील लोकांनाही या पावसाचा मोठा फटका बसला. श्रावस्तीनगर, भीमघाट, देगावचाळ, खुदबईनगर, हिंगोलीगेट आदी भागातील घरे या पावसामुळे प्रभावीत झाली होती.

पूर्णा रोडवरील वाडी बु.च्या हद्दीतील पंढरपूरनगर येथील दहा ते पंधरा घरांमध्ये अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे त्यांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडाले. याबाबत वाडी बु.च्या सरपंचांना कळवले असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार मारोती गायकवाड, हरिदास सोनटक्के, कदीर पोहरे, राहूल खाडे, यशवंत कांबळे, संग्राम सूर्यवंशी, गीताबाई खाडे, आशाबाई पोहरे, सुनिता सोनटक्के, सविता गायकवाड, मिरा गायकवाड, वंदना कांबळे, मंगलबाई पोहरे आदींनी केली आहे.

आयुक्तांच्या घरासमोरही पाणी
पावसाच्या तडाख्याने महापालिका आयुक्तांचेही घर सोडले नाही. स्नेहनगर येथील त्यांचे शासकीय निवासस्थान निशिगंध समोर पावसाचे पाणी साचून होते. त्याचा निचरा योग्य प्रकारे झाला नाही. दोन वर्षांपूर्वी आयुक्त्यांच्या घरापासून २० मीटर अंतरावरील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात पाणी साचले होते. पाऊस असाच सुरु राहिला असता तर इतर अधिकाऱ्यांच्याही घरात पाणी शिरले असते.

विष्णुपुरीचे दरवाजे उघडले
तीन दिवसांपासून विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा वाढल्यामुळे दरवाजे उघडून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी तीन दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते. वरच्या भागात पाऊस सुरु असल्याने आणखी दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असेही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com