हिंगोली : जिल्ह्यातील कृषीपंपांना अखंडीत वीजेसाठी रोहित्रांची पूर्तता करा-  डॉ.नितीन राऊत

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 9 September 2020

विद्युत विकास कामाबाबत पालकमंत्री वर्षा गायकवाड व ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा

नांदेड : हिंगोली जिल्ह्यातील महावितरणच्या विविध योजनेतील सुरू असलेल्या विद्युत विकास कामांचा आढावा घेत शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी रोहित्रांची त्वरित पूर्तता करा असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण व महापारेषण मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी (ता. नऊ) महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना व उच्चदाब वितरण प्रणाली योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. वसमत तालुक्यातील आरळ व हिंगोली तालुक्यातील कानरखेडा येथील उपकेंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या. तसेच सांडस येथील उपकेंद्रांमध्ये ५ एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचेही निर्देश देण्यात आले.

हेही वाचा  कोरोना ब्रेकिंग- नांदेड कारागृहातील ८१ कैद्यांना लागन -

महावितरण व महापारेषण मधील अधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या करून अंमलबजावणी करण्याचे निर्देशही ऊर्जा मंत्र्यांनी दिले

शेतकऱ्यांना दर्जेदार व अखंडित वीज प्राप्त व्हावी यादृष्टीने उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेले दापी, देऊळगाव रामा तसेच बाराशिव उपकेंद्र उभारण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी तसेच याबाबतचे नियोजन महावितरण व महापारेषण मधील अधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या करून अंमलबजावणी करण्याचे निर्देशही ऊर्जा मंत्र्यांनी दिले. पैनगंगा बॅरेजेसच्या विद्युतीकरणाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या सहाय्याने तयार करून सादर करण्याच्या सूचनाही याप्रसंगी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.

वसमत येथे रोहित्र दुरुस्तीसाठी नवीन फिल्टर युनिट प्रस्तावित करण्याचे निर्देश

हिंगोली जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा पुरेसा असल्याने  कृषी पंपाची विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन नादुरुस्त रोहित्र दुरूस्त करून शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर वसमतचे आमदार राजूभैया नवघरे यांनी मागणी केल्यानुसार शेतकऱ्याच्या सोयीसाठी वसमत येथे रोहित्र दुरुस्तीसाठी नवीन फिल्टर युनिट प्रस्तावित करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.दीनदयाळ योजने अंतर्गत बसविण्यात आलेल्या रोहित्रांचे नादुरुस्तीचे प्रमाण खूप असून या रोहितंत्रांच्या गुणवत्तेची व संपूर्ण योजनेची चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री, डॉ. राऊत यांनी आज दिली.

येथे क्लिक कराराज्यस्तरीय हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील 

यांची होती उपस्थिती

यावेळी महावितरणचे संचालक(संचलन) दिनेश साबू, महापारेषणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे व इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या बैठकीस खासदार राजीव सातव, आमदार राजूभैया नवघरे, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. एन.बी. गीते, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर तसेच हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव  हे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Provide Rohitras for uninterrupted power supply to agricultural pumps in the district Dr. Nitin Raut nanded news