
मतदानाच्या दिवशी सर्व खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स व्यापारी संकुल इत्यादी ठिकाणी काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुटी द्यावी व त्यांच्या वेतनातून वेतन कपात करण्यात येवू नये तसेच सवलतीस पात्र असलेल्या आस्थापनांना ही सवलत देणे बंधनकारक आहे.
नांदेड - जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे त्याक्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व उद्योग व्यवसाय आस्थापना चालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टी किंवा दोन तासाची सवलत देण्यात यावी. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वेतन कपात केल्यास ते जिल्ह्यातील जिल्हा कामगार कार्यालयास तक्रार नोंदवू शकतात. खासगी क्षेत्रातील आस्थापनामधील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी मतदान करावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अब्दुल सय्यद यांनी केले आहे.
राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशाद्वारे व शासन परिपत्रकातील परिशिष्टानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकासाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरीत सर्व जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १५) मतदान होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम समाविष्ट आहे. शासनाने या मतदानासाठी भरपगारी सुटी कामगारांसाठी जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी सर्व खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स व्यापारी संकुल इत्यादी ठिकाणी काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुटी द्यावी व त्यांच्या वेतनातून वेतन कपात करण्यात येवू नये तसेच सवलतीस पात्र असलेल्या आस्थापनांना ही सवलत देणे बंधनकारक आहे.
हेही वाचा - नांदेडला कोरोना रुग्णांचा मृत्यूदरात घट, गुरुवारी ४० कोरोनामुक्त; २५ जण बाधित
मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सवलत
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. ही सुटी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी कमीतकमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत त्यांना संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे निर्देश दिले आहेत.
मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसर तसेच सोमवारी (ता. १८) मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, या दृष्टीने ता. १५ जानेवारी रोजी जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मतदान होणार आहे, अशा मतदान केंद्राच्या हद्दीपासून तर ता. १८ जानेवारी रोजी मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खासगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तींस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश ज्या ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहे अशा मतदान केंद्रावर ता. १५ जानेवारी रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहील. तसेच मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत ता. १८ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हा आदेश लागू राहील.
हेही वाचलेच पाहिजे - सावधान : अर्धापुरात बिबट्या पडला विहिरीत; रेस्क्यु आॅपरेशन सुरु
जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश
जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसंदर्भात ता. १५ जानेवारी रोजी मतदान व ता. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होत आहे. ग्रामपंचायत मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई दारुबंदी कायदा अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. जिल्ह्यात मतदान संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजे ता. १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून मतदानाच्या अगोदरचा दिवस ता. १४ जानेवारी संपूर्ण दिवस, मतदानाचा दिवस ता. १५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचपर्यंत अनुज्ञप्ती बंद राहतील. तसेच मतमोजणी होत असलेल्या शहर व तालुक्याच्या ठिकाणी ता. १८ जानेवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश
जिल्ह्यात गुरुवारी (ता. १४) सकाळी सहा वाजल्यापासून ते गुरुवारी (ता. २८ जानेवारी) मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.