आम्हाला आता मदतीची आशा

nnd18sgp17.jpg
nnd18sgp17.jpg

तामसा, (ता.दहगाव, जि. नांदेड) : तामसा भागात शुक्रवारी (ता.१८) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेल्या महापुराचा फटका नदीकाठच्या शेतांना बसल्याने मोठ्या प्रमाणात शेतातील पिके खरडून गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरातील पांगरी, जांभळा, तामसा, दिग्रस, लोहा, चिकाळा, पाथरड, कंजारा या भागातील नदीकाठी शेतीतून पुराचे पाणी प्रचंड वेगाने वाहून शेतातील सोयाबीन, कापूस, हळद, ज्वारी अक्षरशा खरडून लोळली आहेत. 


पुराचा फटका सोयाबीनला 
या भागात शुक्रवारी पहाटे चारच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरवात झाली. तासभरातच नदी-नाल्यांना पुर येवून पुराच्या पाण्याने नदीकाठच्या शेतामध्ये घुसून हैदोस घातला. अनेक ठिकाणी महापुराच्या पाण्याने विक्राळ रूप घेत बांध फोडत शेतातून स्वतःची वाट मोकळी करीत शेतकऱ्यांचे मात्र शेतातील उभे पीक आडवे केले. नदीकाठची शेकडो एकर शेती पूर्णपणे पाण्याखाली बुडाली होती. अनेक शेतामधील शेतातील माती खरडून गेली आहे. कंजारा येथे नदीनाल्यांचे पाणी गावांमध्येही घुसले होते. या पुराचा फटका कापणीच्या तोंडावर असलेल्या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. 

पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी 
आधीच सततच्या पावसामुळे मेटकुटीला आलेला शेतकरी शुक्रवारी पावसाच्या रौद्ररूपामुळे पूर्ण खचला आहे. पावसाच्या पुरामुळे तामसा ते नांदेड व तामसा ते भोकर या रस्त्यातील निर्माणाधीन पूलाच्या बाजूचा पर्यायी पूल पुन्हा वाहून गेल्यामुळे दोन्ही रस्त्यावरील वाहतूक शुक्रवारी बंद होती. तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, मंडळ अधिकारी संजय बिराडे, कृषी अधिकारी व तलाठी यांनी नदीकाठच्या शेतीचे पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 

सोयाबीन, कापूस, ज्वारी पिकांचे नुकसान 
नाला सरळीकरण न केल्यामुळे माझ्या शेतात नाल्याच्या पुराचे पाणी घुसून सोयाबीन पूर्णपणे खरडून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. वीस वर्षांपूर्वी नदीचे पाणी शेतात घुसून झालेल्या नुकसानीची पुन्हा आठवण झाली आहे. शासनाने आम्हाला तातडीने मदत देऊन आधार द्यावा असे सरस्वतीबाई सूर्यवंशी यांनी सांगितले तसेच शुक्रवारी या भागातील नदी परिसरातील शेतीचे पुराच्या तडाख्यात झालेले नुकसान मोठे आहे. कंजारा गावात पुराचे पाणी घुसून घरांचे नुकसान झाले. पुराचा फटका शेती व ग्रामस्थांना दरवर्षीच बसतो. यावर शासनाने नदीपात्राचे खोलीकरण व विस्तारीकरण करून नुकसाणीपासून संरक्षण द्यावे असे दीपक चव्हाण, उपसरपंच, कंजारा यांनी सांगितले. तसेच नदी उफळून वाहताना बघून ग्रामस्थ घाबरले होते. नदीकाठची शेती पुराच्या पाण्याने झाकली होती. गावाच्या जवळील पुलावरून पाणी वाहील्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला होता. नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, कापूस, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे असे विजय कसेवाड, शेतकरी, पाथरड यांनी सांगितले. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com