राज्याच्या पर्यटन महोत्सवात नांदेड जिल्ह्यातील होट्टलचा समावेश; अरूण डोंगरेंच्या प्रयत्नाला यश

अभय कुळकजाईकर
Friday, 5 February 2021

राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने पर्यटन संचालनालयामार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील होट्टल महोत्सवाचा समावेश असून तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी हा महोत्सवाची सुरूवात केली होती. 

नांदेड - राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील सहा विभागांमध्ये विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील होट्टल महोत्सवाचा समावेश असून तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी हा महोत्सवाची सुरूवात केली होती. 

पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी ही माहिती दिली. या महोत्सवांचे आयोजन पर्यटन संचलनालयाच्या प्रादेशिक कार्यालयांच्या वतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मदतीने करण्यात येईल. औरंगाबाद विभागाने काही लोकप्रिय महोत्सवांचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात तेर महोत्सव, बीड जिल्ह्यामधील कपिलधारा महोत्सव तसेच नांदेड जिल्ह्यातील होट्टल महोत्सवाचा समावेश आहे. 

हेही वाचा - गंगाखेडातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना पकडले, एक पिस्टल जप्त 
 

पर्यटन नकाशावर आणण्याचा उद्देश 
पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर म्हणाले की, राज्यातील फारशी लोकप्रिय नसलेली पण महत्वाची ठिकाणे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आणण्याचा उद्देश आहे. कोरोनाचा संकटकाळ अतिशय कठीण होता. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असताना पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राने तयारी केली आहे. राज्याची भटकंती करण्याची संधी या महोत्सवातून उपलब्ध करून देण्यात आली असून महाराष्ट्र समजून घेता यावा, या उद्देशाने पर्यटकांना महोत्सवात सामील होण्याचे आवाहन करत आहोत. राज्याला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा आणि राज्याचे सौंदर्य या महोत्सवांतून पाहण्याची संधी या निमित्ताने पर्यटकांना मिळणार आहे.

हेही वाचलेच पाहिजे - गोदावरी नदी संसद तर्फे नदी जलशुद्धीकरण कारसेवा

होट्टलसाठी अरूण डोंगरे यांचा पुढाकार 
होट्टल (ता. देगलूर) येथील ऐतिहासिक महत्व ओळखून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अरूण डोंगरे यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हा प्रशासनासह आमदार, खासदार निधीतून २०१८ आणि २०१९ अशी दोन वर्षे होट्टल महोत्सव आयोजित केला होता. या मध्ये नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निळकंठ पाचंगे, विजय जोशी, होकर्णे बंधू, उपविभागीय अधिकारी कदम, महेश वडदकर आदींचे योगदान लाभले होते. राज्यभर या महोत्सवाची चर्चा झाल्यामुळे पर्यटन संचालनालयानेही त्याची दखल घेतली. २०२० मध्ये कोरोनामुळे हा महोत्सव घेता आला नाही पण आता २०२१ मध्ये राज्य शासनाने त्याचा समावेश केला आहे. त्या बद्दल नांदेडकरांसह होट्टलवासियांनीही याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी डोंगरे यांचे आभार मानले आहेत.

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

हे तर टीम वर्क - अरूण डोंगरे
होट्टल महोत्सवाची मुहुर्तमेढ रोवणारे तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासनासह खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी देखील त्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे हा महोत्सव सतत दोन वर्षे घेता आला. हे यश माझ्या एकट्याचे नसून सर्वांचे टीम वर्क आहे. जिल्ह्यातील कलावंतांसह राज्यातील कलावंतांना व्यासपीठ मिळाले तसेच होट्टल सारख्या ऐतिहासिक व पुरातन स्थळाला नवी ओळख मिळाली, याचेही मोठे समाधान असल्याचे श्री. डोंगरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hottel in Nanded district included in state tourism festival; Success to Arun Dongre's effort nanded news