बिलोली तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक

biloli.jpg
biloli.jpg

बिलोली, (जि. नांदेड) ः येथील पोलिसांच्या दुर्लक्षामुळे व मूकसंमतीमुळे अवैध प्रवासी वाहतूक तसेच अवैध धंद्यांना ऊत आला असून तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये अवैध धंद्यांचे जाळे पसरले आहे. याकडे नव्याने रुजू झालेल्या पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. 

अनेक गावांमध्ये अवैध धंद्यांचे जाळे 
बिलोली पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावांमध्ये अवैध धंद्यांचे जाळे पसरल्याचे पहावयास मिळत आहे. तर शहरी भागात मटका गुटखा यासह अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सामाजिक प्रदूषण होत आहे. पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जुन्या बसस्थानकाच्या राज्यमार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने भर रस्त्यामध्ये उभी केली जात आहेत. चाळीस फुटांपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्यावरून चार चाकी दोन वाहने चालवणे सुद्धा अवघड झाले आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे या ठिकाणी किरकोळ अपघात नित्त्याचेच झाले आहेत. येथील पोलिसांना काही वाहनचालकांकडून दरमहा पाच ते दहा हजार रुपये हप्ता मिळत असल्याची चर्चा असून पोलिस निरीक्षक सर्रासपणे याकडे डोळेझाक करीत आहेत.

रस्त्यावर विनाअडथळा प्रवास करणे सर्वांसाठी सोयीचे 
यापूर्वी बिलोली येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी शहरातील सर्व वाहतुकीला तसेच फळ विक्रेत्यांना जागा नेमून दिली होती. त्यामुळे वाहतूकदारांना शीस्त लागली होती. शहरातील मुख्य रस्त्यावर विनाअडथळा प्रवास करणे सर्वांसाठी सोयीचे ठरत होते. सध्या कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी काही ठराविक कर्मचाऱ्यांना पोलिस ठाणे चालविण्याचे मोकळीक दिल्यामुळे येथील कारभार रामभरोसे चालू आहे. मटका गुटका यासह अनेक अवैध धंदे बिलोली परिसरातील गावागावात पसरत असून यांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे. बिलोली बोधन राज्य मार्गावर ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मटका, पत्ते आदी धंदे व भेसळयुक्त पेट्रोल विक्री केली जात आहे. अवैध धंदे बंद करणारे पोलिसच अवैध धंद्यांना चालना देत असल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. 

तरुणांचे पावले अवैद्य व्यवसायांकडे
सध्या शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे शहर व परिसरामध्ये अवैध धंदे मोकाटपणे सुरू असल्यामुळे तरुण बेरोजगारसह शाळा महाविद्यालय वयोगटातील विद्यार्थी या अवैध धंद्याकडे आकर्षिले जात आहेत. तेव्हा नव्याने रुजू झालेल्या पोलिस अधीक्षकांनी बिलोली शहर व परिसरातील अवैध मटका, गुटखा यासह अवैध प्रवासी वाहतूक इकडे विशेष लक्ष देऊन ते बंद करावेत अशी मागणी जोर धरत आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com