esakal | नांदेडात गर्भपाताच्या औषधाची अवैध विक्री; पाच जणांविरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

nanded crime news

नांदेडात गर्भपाताच्या औषधाची अवैध विक्री; पाच जणांविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: गर्भपाताच्या औषधाची अवैधरीत्या विक्री केल्याच्या आरोपावरून येथील मेट्रो फार्मा दुकानाचे मालक मालती दीपक भोरगे, फार्मासिस्ट प्रकाश सुदाम लोखंडे, डीकेटी इंडिया कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी बुद्धानंद थोरात, मयूर लोले आणि मयूर वेलापुरे यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.२०) गुन्हा दाखल झाला. अन्न व औषध प्रशासनाने तशी फिर्याद दिली.

अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक माधव जगन्नाथ निमसे यांनी दोन जुलैला मेट्रो फार्मा या घाऊक औषध दुकानाची तपासणी केली. त्यावेळी दुकानदाराने गर्भपाताच्या औषधाची विक्री केल्याची दिसले. नांदेडसह यवतमाळ, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील औषध विक्रेत्यांना त्याने संबंधित औषधाचा पुरवठा केल्याचे आढळले. यासंदर्भत त्याची चौकशी करून प्रशासनाला अहवाल सादर करण्यात आला. त्यात गर्भपाताच्या औषधाची विक्री, खोटी बिले आढळली, डॉक्टरांना औषधी पुरवठा झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अवैधरीत्या गर्भपात करण्यासाठी संगनमत करून काळ्या बाजारात औषधाची विक्री केल्याचा ठपका संशयितांवर ठेवण्यात आला.

हेही वाचा: केसांवर फुगे नव्हे, मिळतात भांडी! बेरोजगारांना मिळतोय रोजगार

नियम माहिती असूनही…
गर्भपात केंद्र म्हणून शासनाची मान्यता असलेल्या दवाखान्यांना किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांना त्यांच्या लेखी मागणीनुसार औषध पुरवठा करणे बंधनकारक आहे. हे माहिती असूनही संशयितांनी नियम डावलून अवैधरीत्या औषध विक्री केली, स्वतःच्या फायद्यासाठी रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण करण्याचे कृत्य करून फसवणूक केली, अशा आशयाची फिर्याद औषध निरीक्षक निमसे यांनी दिली. त्यानुसार पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार प्रशांत जाधव तपास करीत आहेत.

loading image