बेरोजगारांवर अन्याय : ‘एसटी’ प्रमाणपत्र तपासणी कार्यालयासाठी केलेली कंत्राटी पद भरती रद्द

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 12 August 2020

यात अधिकारी, कर्मचारी यांची एकूण २२ पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार विधी अधिकारी, विधी समन्वयक, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संशोधन सहायक या पदांसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या होत्या

नांदेड : आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णयान्वये जिल्ह्यातील किनवट येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय सुरु करण्यासाठी मंजूरी प्रदान केलेली होती. या समितीसाठी आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी तत्वावर पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली होती. यात अधिकारी, कर्मचारी यांची एकूण २२ पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार विधी अधिकारी, विधी समन्वयक, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संशोधन सहायक या पदांसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या होत्या. तसेच लिपीक टंकलेखक, माहिती तंत्रज्ञान तथा संगणक सहायक, लघु टंकलेखक, शिपाई व सफाईगार या पदांसाठी येणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यात आले होते.

राज्यातील कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे वित्तीय उपाययोजनेच्या अनुषंगाने शासनाने चालु वित्तीय वर्षात सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता कोणत्याही विभागाने प्रकारची नवीन पदभरती करु नये, याबाबत सुचित केलेले आहे.

भरती प्रक्रिया रद्द 

राज्यातील कोरोना आजार प्रादुर्भाव स्थिती पाहता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट ता. किनवट जि. नांदेड येथील कंत्राटी पदभरती रद्द करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असल्याने भरती प्रक्रिया रद्द करित असल्याचे औरंगाबाद अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती यांनी कळविले आहे.

हेही वाचा उर्दू नव्हे तर जागतिक शायरी विश्वातील सूर्याचा अस्त- डॉ. फहीम सिद्दीकी

दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, सेवासंस्थांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड : जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वंयसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाने सन २०२० च्या अर्ज मागविले आहेत. हे अर्ज ता. नऊ सप्टेंबरच्या आत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.  

केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कार योजनेचा तपशिल व त्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्घ आहे. आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांच्या पत्रान्वये या पुरस्कारासाठी पात्र असलेले व्यक्ती व स्वंयसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्याबाबत सुचित केले आहे.

ता. २२ आॅगस्टनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत

जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व सदर पुरस्कारासाठी पात्र असलेल्या व्यक्ती व स्वंयसेवी संस्था यांनी आपले परिपूर्ण असलेले अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड या कार्यालयात २२ ऑगस्ट रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injustice on Unemployed: Contract recruitment for ST Certificate Inspection Office canceled nanded news